Wednesday, August 5, 2015

श्री संत ज्ञानेश्वर महाराज... तेराव्या शतकामध्ये महाराष्ट्रात संस्कृत भाषा दुर्मिळ होत चालली होती. समाजातील अतिशय कमी लोक संस्कृत जाणत व त्या भाषेतील धार्मिक पुस्तके अभ्यासत. या कारणास्तव समाजातील बहुतांश लोकांना संस्कृतमधिल धर्मिक ग्रंथ आणि ज्ञानसंपदेपासून वंचित रहावे लागत होते. अशा परीस्थीतीमध्ये ज्ञानाच्या क्षितीजावर एक अतिशय तेजस्वी तारा जन्माला आला, ज्याने स्व:ताशी सामान्य लोकांना समजणा-या भाषेत - मराठीमध्ये लिहिण्याची शपथ घेतली. हा तारा दुसरा तिसरा कोणी नसून संत ज्ञानेश्वर होते ज्यांनी त्या काळातल्या संस्कृतमधे लिहिण्याच्या प्रथेला मोडीत काढून मराठीमध्ये लिहिण्याचे धाडस दाखविले. ज्ञानेश्वर महाराजांना मराठी भाषेमधिल शक्तीबद्दल ठाम विश्वास होता, त्यामुळे त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये असा उल्लेख केला आहे की याचे रसग्राही वाचक नक्की असे म्हणतील की मराठी भाषा ही अमॄतापेक्षाही मधूर आहे. कौटूंबिक परंपरा:- ज्ञानेश्वरी हा वारकरी सांप्रदायामध्ये सर्वमान्य ग्रंथ आहे. प्रत्येक वारक-याचा असा विश्वास आहे की ज्ञानेश्वरी हा वारकरी सांप्रदायाचा पाया आहे, परंतु ही अतिशय खेदाची गोष्ट आहे ही ज्ञानेश्वरी चे जनक संत ज्ञानेश्वर महाराजांबद्दल अतिशय कमी माहिती उपलब्ध आहे. त्यांच्या जीवनाबद्दलचा थोडीफार उल्लेख सच्चिदानंद बाबा लिखित ’ज्ञानेश्वर विजय’ तसेच संत नामदेव रचित काही अभंगामध्ये आढळतो. संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवनचरित्र हे बहुतांषी काल्पनिक व वरिल ग्रंथांवर आधारित समजले जाते. पैठण च्या पुर्वेला सुमारे आठ मैलावर गोदावरी नदीच्या उत्तर तीरावर आपेगाव नावचे गाव आहे. संत ज्ञानेश्वरांचे पुर्वजांना या गावामध्ये कुळ्कर्णी वतन होते. उपलब्ध माहितीनुसार ज्ञानेश्वरांचे एक पुर्वज हरिपंत हे शके १०६० (सन ११३८) मध्ये येथील वतनदार होते. त्यांच्यानंतर त्यांचे वंशज रामचंद्रपंत तद्नंतर त्यांचे पुत्र गोपालपंत, नंतर त्रिंबकपंत यांच्याकडे ही वतनदारी वंशपरंपरेने आली. त्या वेळी राजा जैत्रपालाचे राज्य होते त्यांनी त्रिंबकपंतांचे पुत्र हरिपंत यांना राज्यामधून देशमुखांची बंडखोरी मोडून काढण्याचे कार्य सोपवले. ही बंडखोरी मोडून काढताना झालेल्या युद्धामध्ये दुर्दैवाने हरिपंतांचा मृत्यू झाला. पुत्राच्या मृत्यनंतर व्यथित झालेल्या त्रिंबकपंतांचे भौतिक गोष्टींमध्ये मन उडाले आणि त्यानी त्याचे उर्वरित आयुष्य ईश्वरसेवेमध्ये व्यतित करण्याचे ठरविले. त्यानंतर एकदा तीर्थाटन करित असताना महान संन्यासी गोरखनाथ आपेगावी पोहोचले, त्यांनी त्रिंबकपंतांना अनुग्रहित करून त्यांचा शिष्य म्हणुन स्विकार केला. त्रिंबकपंत जे ज्ञानेश्वरांचे पणजोबा होते ते परिवामधिल पहिले तत्वज्ञ व धर्मिक वृत्तीचे व्यक्ती होते. त्यांचे व्दीतिय पुत्र विठ्ठलपंत यांची ७ व्या वर्षी मुंज झाल्यानंतर लवकरच त्यांनी आपले वेद आणि शास्त्राचे शिक्षण पुर्ण केले व आपल्या वडिलांच्या परवानगीने धार्मिक स्थळी तिर्थयात्रा केल्या. लहानपणापासुनच ते धार्मिक होते. व्दारका, सप्त-श्रूंगी, त्रंबकेश्वर, भिमाशंकर आणि इतर धार्मिक स्थळांना भेटी दिल्यानंतर विठ्ठलपंत आळंदी येथे आले. येथे श्री सिद्धोपंत यांनी आपल्या कन्येचा विवाह अनुरुप अशा विठ्ठलपंतांशी करुन दिला. लग्नानंतर विठ्ठलपंतांनी दक्षिणेकडे श्रीशैल, व्यंकटगिरी, रामेश्वर, गोकर्ण आदि तिर्थक्षेत्रांना भेटी दिल्या व आळंदीला परतले. त्यानंतर ते आपली पत्नी व सासू-सास-यांबरोबर आपेगावी आले. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर संपुर्ण घराची जबाबदारी विठ्ठलपंतांवर आली, परंतु त्यांच्या ठायी असलेल्या धार्मिक प्रवृत्तीमुळे त्यांचे त्यामधे लक्ष लागेना व ते आपल्या जबाबदारीपासून अलिप्त राहू लागले. त्यांच्या पत्नी रुक्मिणीबाईंच्या जेव्हा हे लक्षात आले तेव्हा त्यांनी ही गोष्ट आपल्या आई-वडिलांना कळविली व ते आपेगावी येऊन रुक्मिणीबाईंना व आपल्या नातवाला घेऊन आळंदीला परतले. विठ्ठलपंतांची काशीला जाऊन संन्यास घेण्याची ईच्छा होती व त्यांनी ती अनेकवेळा आपल्या पत्निकडे बोलूनही दाखविली होती आणि तसे करण्याची परवानगिही मागितली होती, परंतु रुक्मिणीबाईंनी ती दरवेळी नाकारली होती. एके दिवशी मात्र ते स्नानासाठी म्हणून घराबाहेर पडले व थेट काशी गाठली. तेथे त्यांनी श्री रामानंदस्वामी यांचे शिष्यत्व स्विकारले व ब्रम्हचर्याचे पालन करू लागले. त्यांनी स्वामीजींना आपण एकटे असून पत्नी-मुलांची जबाबदारी नसल्याचे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेउन त्यांना मंत्रविद्या देऊ केली व संन्यासी बनविले आणि चैतन्याश्रम हे नवीन नावही दिले. रुक्मिणीबाईंची देवावर श्रद्धा होती, जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हा त्यांनी त्याचे दु:ख मानून न घेता काही न घडल्याप्रमाणे आपली देवावरची भक्ति कायम ठेवली. अशा प्रकारे १२ वर्ष उलटली. एके दिवशी संध्याकाळी त्या मारुतीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये गेल्या असताना तिथे त्यांना एक अतिशय बुद्धिमान स्वामी भेटले, त्यांना नमस्कार केल्यानंतर त्यांनी रुक्मिणीबाईंना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला. हे ऐकल्यानंतर रुक्मिणीबाईंना हसू आवरणे कठीण झाले. स्वामीजींनी हसण्याचे कारण विचारले असता रुक्मिणीबाईंनी विठ्ठलपंतांची संन्यासी होण्याची हकिकत सांगितली. ती हकिकत ऐकून स्वामीजींनी दु:ख व्यक्त केले व चैतन्याश्रम ज्यांना त्यांनी स्व:ताच्या हस्ते संन्यासत्व दिले होते, तेच विठ्ठलपंत आहेत असे लक्षत आले. त्यांना वाईट वाटले की विठ्ठलपंतांच्या शब्दावर आंधळेपणाने विश्वास ठेऊन त्यांनी एका निरपराध स्त्रीला वैवाहिक जीवनापासून वंचित ठेवण्याचा अपराध केला आहे. स्वामीजींनी तात्काळ आपला दक्षिणेकडे जाण्याचा संकल्प खंडित केला व सिद्धोपंत व रुक्मिणीबाईंना घेऊन काशीकडे निघाले. काशीला पोहोचल्यावर रामानंदस्वामींनी आपल्या शिष्याला - चैतन्याश्रमाला बोलावले व त्याच्यापुढे सर्व वस्तुस्थिती ठेवली. जेव्हा त्याने आपण केलेली चुक मान्य केली तेव्हा स्वामींनी त्यांना माफ केले व संन्यास सोडून देऊन गृहस्थाश्रम स्विकारण्याची आज्ञा केली. विठ्ठलपंतांपुढे आपल्या गुरुंची आज्ञा मान्य करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता व ते आपली पत्नी व सास-यांसहित आळंदीला परत आले. विठ्ठलपंतांची मुले:- विठ्ठलपंतांना शके ११९५ मध्ये पहिला मुलगा झाला. त्याचे नाव निवृत्तीनाथ ठेवण्यात आले. त्यानंतर रुक्मिणीबाईंनी आणखी तीन मुलांना जन्म दिला त्यांची नावे ज्ञानेश्वर (शके ११९७), सोपान (शके ११९९) आणि मुक्ताबाई (शके १२०१) अशी ठेवण्यात आली. विठ्ठलपंत हे पहिल्यापासुनच धार्मिक प्रवृत्तीचे होते त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांची नावे भारतिय तत्वज्ञानानुसार ठेवली. जेव्हा कोणी संसारातून निवृत्त होतो (निवृत्ती) तेव्हा त्याला ज्ञान (ज्ञानदेव) प्राप्त होते व जेव्हा ज्ञान प्राप्त होते तेव्हा त्याला असा पूल (सोपान) प्राप्त होतो जो मुक्ती (मुक्ताबाई) मिळवून देतो. मोक्ष मिळविण्याच्या या पाय-या विठ्ठलपंतांनी आपल्या मुलांच्या नावांमधून सुचविल्या. अशा प्रकारे ही मुले विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांच्या देखरेखीखाली आळंदीमध्ये मोठी होत होती. धार्मिक प्रथांप्रमाणे निवृत्तीनाथांचे मुंजीचे वय झाले होते त्यामुळे विठ्ठलपंतांनी ब्राम्हणांना त्याची मुंज करण्याची विनंती केली परंतु एकदा संन्यास घेऊन परत संसार सुरू करणा-या विठ्ठलपंतांकडे ते धर्माविरुद्ध असल्याचे कारण सांगुन कोणतेही धार्मिक विधी करण्यास नकार दिला. विठ्ठलपंतांनी ब्राम्हणांना त्यांनी केलेल्या पापाचे प्रायश्चित करवून घेऊन निवृत्तीनाथांची मुंज करण्याची विनंती केली. परंतु सर्व सनातनी ब्राम्हण त्यांच्या निर्णयापासून अजिबात मागे हटले नाहीत व काही धार्मिक ग्रंथांचा आधार घेऊन पापाचे प्रायश्चित म्ह्णून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंनी गंगा व यमुनेच्या संगमामध्ये आपले जीवन संपवावे असे सांगितले. देवभोळ्या विठ्ठलपंतानी हा निर्णय स्विकारला व आपली पत्नी रुक्मिणीबाईंबरोबर प्रयाग येथे गंगा-यमुनेच्या संगमामध्ये उडी मारुन प्राणत्याग केला. अशा प्रकारे अतिशय कोवळ्या वयामध्ये या चार मुलांना आळंदीमधिल सनातनी व दुराग्रही वृत्तीमुळे अनाथ व्हावे लागले. त्या वेळी निवृत्तिनाथ केवळ १० वर्षाचे होते आणि त्यांची भावंडे अजुनही लहान होती. अशा स्थितीमधे आपण त्या मुलांचे दु:ख समजू शकतो परंतु त्या काळचे ब्राम्हण इतके निर्दयी कसे होते याचे आश्चर्य वाटते. संकटं आपल्या माता-पित्याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर निवृत्तीनाथ आपल्या धाकट्या भावंडंना घेऊन आपेगावला आले. तेथील नातेवाईकांची काही मदत होईल अशी त्यांची अपेक्षा होती, परंतु विठ्ठपंतांच्या अनुपर्थितीमध्ये सर्व नातेवाईकांनी या पोरक्या झालेल्या मुलांकडे पाठ फिरविली व मदतीचे सर्व दरवाजे बंद केले. उदर्निर्वाहासाठी निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वरांना भिक्षा मागण्याची वेळ आली. या परीस्थीतीमध्ये ते परत आळंदीला परतले, परंतु तेथील समाजाने त्यांना वाळीत टाकलेले होते त्यामुळे तेथेही त्यांचे चित्त लागेना. त्या काळी पैठण हे ज्ञान मिळविण्याचे एक महत्वाचे ठिकाण होते व तेथे ब्राम्हणांचे वर्चस्व होते. ज्ञानेश्वरांना एक प्रयत्न म्हणून तेथील ब्राम्हणांकडून आपल्या पावित्र्याचे प्रमाणपत्र घ्यावे असे मनात आले. ज्ञानेश्वरांच्या आग्रहाखातर निवृत्तिनाथ आपल्या भावंडांना घेऊन पैठण ला निघाले. आळंदी ते पैठण पायी प्रवास करताना त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. तेथील ब्राम्हणांनी देखील त्यांचा अव्हेर केला. ज्ञानेश्वरांनी देव हा सर्व ठायी असतो त्यामुळे सर्व त्यामुळे कोणाचा अव्हेर करु नये असे म्हणाताच तेथील ब्राम्हणांनी त्यांना तेथुन जाणा-या एका रेड्याच्या तोंडी वेद म्हणविण्याचे आव्हान दिले. असे म्हणतात की ज्ञानेश्वरांनी त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवताच तो रेडा एखाद्या ब्राम्हणाने म्ह्णावे तसे वेद म्हणू लागला. हा चमत्कार तेथील ब्राम्हणांनी बघितल्यावर त्यांना हार मानायला लागली व ज्ञानेश्वरांच्या दैवी शक्तीला हात जोडावे लागले. या घटनेमुळे तेथील ब्राम्हणांनी पावित्र्याचे प्रमाण्पत्र तर दिले, परंतु निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वरांची मुंज कधीच होऊ शकली नाही. हा चमत्कार झाल्यानंतर अजून एक चमत्कार ज्ञानेश्वरांच्या हातून नेवासे घडण्याच्या प्रतिक्षेत होता. नेवासे गावाचा उल्लेख ज्ञानेश्वरी मध्ये आढळतो जेथे त्यांनी हा ग्रंथ लिहीला. नेवासे येथे गेल्यावर त्यांना एका मृत शरीराजवळ एक स्त्री आक्रोश करत असलेली दिसली. त्या मृत व्यक्तीचे नाव सत्चिदानंद आहे असे कळाल्यावर अशा नावाची व्यक्ती निर्जीव असू शकत नाही असे म्हणून ज्ञानेश्वरांनी आपल्या हातांचा अमृतस्पर्श त्या मृत शरीरास केला व त्याला उठण्यास सांगितले. असे होताच ती व्यक्ती झोपेतून जागे झाल्याप्रमाणे उठून बसली. ह्याच सत्चिदानंदबाबांना नंतर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ऐकवून त्यांच्याकडून लिहून घेतली. सत्चिदानंदांनी तद्नंतर ज्ञानेश्वर विजय हा ग्रंथ लिहिला, परंतु काळाच्या ओघात त्याचे अस्तित्व संपुष्टात आले व तो आता उपलब्ध नाही. हा ग्रंथ जर उपलब्ध असता तर आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांबद्दलची आणखी माहिती उपलब्ध होउ शकली असती, परंतु देवाच्या मनात काही वेगळेच असावे त्यामुळे आता त्यांचे जीवनचरित्र समजून घेण्यासाठी इतर संदर्भांचा आधार घ्यावा लागत आहे. भावार्थ दिपीका - अर्थात ज्ञानेश्वरी:- खुद्द ज्ञानेश्वरी मध्येच नमूद केल्याप्रमाणे भगवद्गीतेच्या या एकमेवाव्दितीय अशा भाष्याची/टीकेची निर्मिती शके १२१२ साली झाली. ज्ञानेश्वरांच्या चरित्रावरुन असे लक्षात येते की त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली. त्या काळी उपलब्ध असलेली तत्वज्ञानाविषयीची पुस्तके, तसेच लोकांच्या चालिरीती, जीवनाचे सिद्धांत याचे ज्ञान इतक्या कमी वयामध्ये कसे असू शकते याचे आपल्याला आश्चर्य वाटते. परंतु स्व:ता भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे, ज्ञानी मनुष्य हा उच्च कुळामध्ये पुनर्जन्म घेतो व आपल्या वयावर मात करतो, यावरुन आपण असे म्हणू शकतो की श्री ज्ञानेश्वरांनी हे सर्व ज्ञान आपल्या आधीच्या जन्मात मिळविले असेल व त्यांनी त्या अर्जित ज्ञानासह पुनर्जन्म घेतला असेल. ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरील टीका आहे असे मानले जाते, परंतु त्याचबरोबर तो एक भारतिय तत्वज्ञानाला व्यक्त करणारा/अधोरेखित करणारा स्वतंत्र ग्रंथ आहे. भगवद्गीतेमध्ये असलेल्या ७०० च्या आसपास असणा-या श्लोकांचा विस्तार करून ज्ञानेश्वरीमध्ये ८५०० ओव्या लिहील्या गेल्या यावरुनच त्याचे वेगळेपण लक्षात येते. उदाहरणच द्यायचे झाले तर गीतेच्या सहाव्या अध्यायामध्ये असलेल्या ४७ श्लोकांचे विस्तारित भाष्य ज्ञानेश्वरीमध्ये ४९७ ओव्यांच्या रुपात पहायला मिळते तसेच दहाव्या अध्यायाचा विस्तार करुन ११२४ ओव्या आहेत, सर्व अध्यायांची अशी संख्यात्मक तुलना करता येईल, परंतु वर नमुद केलेली वस्तुस्थिती सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. ज्ञानेश्वरीची निर्मिती भगवद्गीतेचा आधार घेउन केल्याचे कारण त्या काळामध्ये तो ग्रंथ सर्वांच्या श्रद्धास्थानी होता. ज्ञानेश्वरीला फक्त त्यातील तत्वज्ञानामुळे महत्व नाही, तर ते एक अद्भुत कल्पनाशक्ती असलेले काव्य आहे. त्यातील भाषासुद्धा एकमेवव्दितीय अशीच आहे. त्यामध्ये वापरलेले शब्द तसेच वाक्प्रचार हे ईतके तंतोतंत व चपखल वापरलेले आहेत की आत्तापर्यंत कोणालाही त्याऎवजी वापरता येतील असे शब्द सुचू शकलेले नाही. यामध्ये वापरलेली साजेशी अलंकारिक भाषा ज्ञानेश्वरांचे भाषेवरिल प्रभुत्व दर्शविते. ज्ञानेश्वरांच्या म्हणण्यानुसार यातील मोहक भाषा वाचून त्याचे वाचक नक्की अशी प्रशंसा करतील की मराठी भाषा ही अमॄतापेक्षाही मधुर आहे. ज्ञानेश्वर हे एक योगी होते. योगविद्यांमध्ये ते पारंगत होते. ते जेव्हा या विषयावर काही भाष्य करित तेव्हा त्यांचा आत्मविश्वास बघून असे वाटत असे की ते कोणतीही ऎकीव गोष्टी बोलत नसून स्वानुभवातून बोलत आहेत. त्यांनी घेतलेली संजीवन समाधी सुद्धा ते एक योगी असल्याचे दर्शविते. योगाबरोबरच त्यांनी भक्तीचे मुर्तिपुजेसारखे इतर मार्गही अवलंबिले तसेच त्याचे मानवजीवनातील महत्व पटवून दिले. विठ्ठलाची भक्ती करणा-या वारकरी सांप्रदायासाठी ज्ञानेश्वरी हा श्रद्धास्थानी असलेला ग्रंथ आहे. प्रवचनांमध्ये यातील ओव्यांचा अनेकदा संदर्भ दिला जातो. वारकरी सांप्रदायाबरोबरच मराठी साहित्याचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा महत्वाचा ग्रंथ आहे व ज्ञानेश्वरीशिवाय त्यांचा अभ्यास अपूर्ण मानला जातो. नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास यांसारख्या संतांनी सुद्धा ज्ञानेश्वरीचे अतिशय श्रद्धेने संदर्भ दिले आहेत व ज्ञानेश्वरांचे अनुयायी असल्याचा त्यांना सार्थ अभिमान वाटत असे. धार्मिक विषयावर काव्य करणा-या अनेक कवींनी ज्ञानेश्वरीमधल्या वचनांचा, विचारांचा उपयोग केला आहे व आपल्या काव्यासाठी ज्ञानेश्वरीमधून स्फुर्ति मिळाल्याचे कबूल केले आहे. जसे अनेक ग्रंथ निर्मितीसाठी भगवद्गीतेचा आधार घेतला गेलेला आहे, तसेच ज्ञानेश्वरीमधील तत्वज्ञान समजावून सांगण्यासाठी अनेक पुस्तकांची निर्मिती झालेली आहे. ज्ञानेश्वरीची निर्मिती होऊन सुमारे ७०० वर्ष उलटून गेल्यामुळे यातील भाषा आता नवीन पिढीसाठी काहीशी अनाकलनिय झालेली आहे व त्यामुळे त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरी वाचणे व त्याचा अर्थ समजवुन घेणे हे एखाद्या मार्गदर्शकाशिवाय अवघड आहे. इतर कार्य:- ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरील टीका आहे असे मानण्यात येते, त्यामुळे ज्ञानेश्वरी निर्माण केल्यानंतर जेव्हा ज्ञानेश्वर आपले गुरू निवृत्तीनाथांकडे गेले तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरांना काहीतरी स्वतंत्र करण्यास सुचविले. त्यांच्या सुचनेनुसार ज्ञानेश्वरांनी अमॄतानुभव (अनुभवामृत) हा ग्रंथ लिहीला ज्यामध्ये त्यांनी तत्वज्ञान व योगामधील अमृतासम आलेले अनुभव सांगितले आहेत. हा ग्रंथ जरी सर्वदूर प्रसिद्ध पावला नसला तरी तो ज्ञानेश्वरीइतकाच महान आहे. त्यामध्ये वापरलेली भाषा, लिहीण्याची पद्धत, यावरून तो ज्ञानेश्वरांनी लिहीला यात काही संदेह रहात नाही. योग वसिष्ठ हा अजून एक ग्रंथ श्री ज्ञानेश्वरांनी लिहीला असे मानले जाते, परंतु त्याचा बारकाईने अभ्यास केल्यास असे लक्षात येते की जरी तो ग्रंथ लिहीण्याची पद्धत ज्ञानेश्वरीशी मिळतीजुळती वाटली तरी त्यातील रचना, भाषा तसेच काव्यकल्पना ही ज्ञानेश्वरीच्या तोडीची वाटत नाही. त्यामुळे मराठी साहित्याच्या जाणकारांमध्ये योग वसिष्ठ हा ज्ञानेश्वरीकर्ता ज्ञानेश्वरांनीच लिहिला असण्याबद्दल संदेह आहे. त्यामुळे असे वाटते की कोणीतरी ज्ञानेश्वरी लिहीण्याच्या पद्ध्तीची नक्कल करून तो ग्रंथ ज्ञानेश्वरांचा आहे असे भासविले असावे. ज्ञानेश्वरांनी सुमारे १२०० अभंग लिहीले असे मानले जाते, परंतु त्या अभंगांबाबतीत सुद्धा असाच निष्कर्ष काढता येतो की त्यामधील शब्दरचना, वैचारिक पातळी ही ज्ञानेश्वरांची वाटत नाही. आपण असे म्हणू शकतो की १२०० पैकी सुमारे ३०० अभंग हे स्व:ता ज्ञानेश्वरांनी लिहीले असावेत बाकीचे इतर कवींनी लिहून ज्ञानेश्वरांचे आहेत असे भासविले असावे. चमत्कार:- यापुर्वीच आपण ज्ञानेश्वर महारांनीच्या रेड्याच्या तोंडून वेद म्हणविल्याच्या व सच्चिदानंदांना पुनर्जिवित केल्याच्या चमत्कारांविशयी बघितले आहे. त्यानी इतरही काही चमत्कार दाखविले. एकदा पैठण येथे एका ब्राम्हणाला त्याच्या वडीलांचे वर्षश्राद्ध घालावयाचे होते, ज्ञानेश्वरांनी त्याला श्राद्धाची सर्व तयारी करण्यास सांगितले व तेथे गेल्यावर सर्व पीतरांना श्राद्धाचे भोजन करण्यास येण्याची विनंती केली. श्राद्धाच्या विधीमध्ये सर्व पीतर येउन भोजन करुन जातात असे मानले जाते परंतु ते कोणासही दिसत नाहीत, परंतु ज्ञानेश्वरांच्या आवाहनानंतर पीतर भौतिक स्वरुपात प्रकट होऊन त्यांनी त्या भोजनाचा स्वाद घेतला. आळंदी येथे विसोबा नावाचा एक ब्राम्हण रहात असे, तो अतिशय कर्मठ होता, साधू, संतांचा उपहास करत असे. एके दिवशी निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईंकडे मांडे खाण्याची ईच्छा व्यक्त केली. मांडे बनविण्यासाठी लागणारे भांडे नसल्यामुळे मुक्ताबाई ते भांडे आणण्यासाठी गेल्या, विसोबांनी सर्व कुंभारांना मुक्ताबाईंना काहीही देण्यास मज्जाव केला असल्याने मुक्ताबाई रिकाम्या हाताने दु:खी होऊन परत आल्या कारण या घटनेने निवृत्तीनाथ नाराज होतील असे तिला वाटले. जेव्हा ही गोष्ट ज्ञानेश्वरांना समजली तेव्हा त्यानी आपल्या योगसामर्थाच्या जोरावर स्व:ताच्या शरिरामध्ये ऊर्जा निर्माण केली व मुक्ताबाईंना मांडे आपल्या पाठीवर भाजण्यास सांगीतले. एखाद्या चुलीमध्ये भाजल्यासारखे ते मांडे भाजून निघाले. चांगदेव नावाचे एक दीर्घायू योगी होते. त्यांचे वय चौदाशे वर्ष आहे असे मानले जात असे. त्यांनी आपल्या योगसामर्थ्यावर वाघ, सर्प अशा हिंस्त्र श्वापदांना वशीभूत केलेले होते. त्यांना आपल्या सामर्थाचा गर्व झालेला होता. ज्ञानेश्वरांचे सामर्थ्य त्यांच्या कानी पडलेले होते. एकदा ते ज्ञानेश्वरांच्या भेटीसाठी वाघावर बसून निघाले, हाती सर्पाचा असूड होता. त्यावेळी ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे एका भींतीवर बसलेले होते. चांगदेव भेटीला येत आहेत हे समजल्यावर ज्ञानेश्वरांनी ती स्व:ता बसलेली भींतच चालविली व चांगदेवांच्या स्वागतासाठी सामोरे गेले. आपण फक्त प्राण असलेल्या जीवितांना वशीभूत करु शकतो परंतु ज्ञानेश्वर हे निर्जिव वस्तूंनासुद्धा वश करू शकतात हे पाहून आपण ज्ञानेश्वरांना कमी लेखण्यात चुक केली याचा त्यांना पश्चात्ताप झाला. त्यांनी ज्ञानेश्वरांची क्षमा मागून त्यांचे शिष्यत्व पत्करले. ज्ञानेश्वरांनी केलेल्या चमत्कारांची अनेक उदहरणे देता येतील, परंतु वर दिलेल्या उदाहरणांवरुनच त्यांच्या दैवी शक्तीची प्रचिती येते. समाधी:- ’अमृतानुभव’ ग्रंथाचे निर्माण केल्यानंतर ज्ञानेश्वरांनी अनेक पवित्र स्थळांना भेटी दिल्या. नामदेवांनी ’तीर्थावली’ म्हणुन संबोधल्या गेलेल्या आपल्या अभंगांमध्ये ज्ञानेश्वरांच्या या तीर्थाटनाचे चित्ररुपी वर्णन केले आहे. आपले तीर्थाटन संपल्यानंतर ज्ञानेश्वरांना आपल्या जीवनामधील कार्य संपले आहे असे वाटले व त्यांनी जिवंतपणे समाधी घेण्याचे ठरविले. जेव्हा त्यांच्या आप्तेष्टांना या गोष्टीचे ज्ञान झाले तेव्हा हा ज्ञानाचा महासागर आपल्याला सोडुन जाणार म्हणून अतिव दु:ख झाले. परंतु ज्ञानेश्वर आपल्या निर्णयावर ठाम होते. अखेरीस त्यांनी कार्तिक महिन्यामध्ये कृष्ण पक्षात त्रयोदशीला शके १२१८ रोजी आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. संत नामदेवांनी त्यांच्या ’समाधीचे अभंग’ मध्ये याचे चित्ररुपी वर्णन केले आहे. या ज्ञानाच्या सुर्यास्तानंतर त्यांच्या भावंडांच्या नजरेसमोर अंध:कार पसरला व त्यांनीसुद्धा स्व:ताचे अस्तित्व संपविण्याचा निर्णय घेतला व वर्षभरामध्ये सर्वांनी आपले जीवन संपविले व या नाशवंत जगाचा निरोप घेतला

No comments:

Post a Comment

Featured Post

step in Book review

Certainly! Here’s a detailed step-by-step guide for HSC English students on how to write a book review. This structured approach will help y...