Friday, August 31, 2018

विनोद !

विनोद म्हणजे स्पॉट पेमेंट ...
ताबडतोब कळला तर तो विनोद! तो विनोद होता असे इतर कुणी सांगावे लागणे हा दुसरा विनोद आणि इतर लोक टाळ्या वाजवू लागल्यानंतर आपणही टाळ्या वाजविणे हा तिसर्‍या दर्जाचा विनोद! अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे, तर जगात जिथे जिथे मराठी माणूस आहे त्याला एकाच वेळेला एकाच ‘टायमिंग’ला हसायला भाग पाडणे हा महाविनोद !

हास्यामध्ये पर्यवसित होणाऱ्या जीवनविषयक सुखात्म जाणिवेची प्रतीती देणारा धर्म म्हणजे विनोद असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल. विनोदाला समानार्थी ‘ह्यूमर’ हा इंग्रजी शब्द मुळात लॅटिन असून त्याचा अर्थ आर्द्रता वा द्रव असा होतो. संस्कृत ‘विनोद’ या संज्ञेची फोड ‘वि+नुद्’ (आनंद देणे. रिझवणे; किंवा घालवणे, दूर करणे म्हणजे दुःख, निराशा इ. घालवणे) अशी केली जाते. विनोदाच्या अर्थाने ह्यूमर ही संज्ञा प्रथमतः अठराव्या शतकात वापरात आली. तुच्छता, निंदाव्यंजकता वा टवाळखोरपणा ह्यांहून वेगळा असा प्रसन्न, आनंददायी. भावरूपात्मक विनोद ‘ह्यूमर’ या संज्ञेने सूचित केला गेला.

विनोद हा जसा साहित्यातून आविष्कृत होतो, तसाच तो चित्रातून दृश्यरूपाने प्रकटतो; नाटकामधून अभिनीत होतो; सर्कशीतून, तमाशातून कृतिरूपाने प्रकट होतो. विनोद हा केवळ कलाप्रकारातूनच प्रकट होतो असे नव्हे; तर प्रत्यक्ष जीवनातही घडत असतो व तो साधारणतःसर्वांना प्रिय व आस्वाद्य वाटतो. विनोदाला प्रत्यक्ष जीवनामध्ये स्थान असल्यामुळे विनोदाचा विचार केवळ साहित्याचा वा कलाविष्काराचा भाग म्हणून न होता, जीवनानुभवाच्याही अंगाने होणे स्वाभाविक आहे. अनेक कलाप्रकारांशी निगडित असलेल्या आणि प्रत्यक्ष जीवनातही सातत्याने प्रकटणार्याअ विनोदाचा विचार बराच गुंतागुंतीचा ठरतो. विनोदाची निर्मिती कशी होते, हे सांगणाऱ्याउपपत्ती जशा जीवनाच्या अनुषंगाने मांडल्या जातात, तशाच त्या कलेच्या अनुरोधानेही मांडल्या जातात. शब्द या माध्यमाचा उपयोग करून वाङ्मयातून प्रकट होणारा विनोद स्वाभाविकपणे विविध रूपे धारण करून प्रकट होतो. म्हणून वाङ्मयीन विनोदाच्या विचाराला महत्त्वाचे स्थान प्राप्त होते. विनोद या संकल्पनेचे स्वरूप ध्यानात येण्यासाठी विनोदाची निर्मिती का व कशी होते, हे सांगणाऱ्याउपपत्तींचा परामर्श घेणे उपयुक्त ठरते. विनोदाची संकल्पना ही गुंतागुंतीची असल्यामुळे तिचे स्वरूप विशद करण्याच्या दृष्टीने प्राचीन काळापासून आजपर्यंत अनेकविध नवनवीन उपपत्ती तत्त्वज्ञ, मानसशास्त्रज्ञ, प्रतिभावंत लेखक, समीक्षक आदींनी मांडलेल्या आहेत. ह्या उपपत्ती विनोदाच्या स्वरूपावर काही एक प्रकाश टाकत असल्याने, त्यांचा परामर्श घेऊन विनोदाचे स्वरूप उलघडता येईल.

विनोदाची निर्मिती कशी होते याबद्दल काही उपपत्ती आशयाला महत्त्व देऊन, तर काही उपपत्ती अभिव्यक्तिवैशिष्ट्याला अथवा तंत्रविशेषांना महत्त्व देऊन मांडल्या गेल्या आहेत. आशयाला महत्त्व देऊन मांडल्या गेलेल्या बहुतेक उपपत्ती ह्या व्यंगकल्पना, आक्रमणकल्पना व क्रीडावृत्ती ह्या कल्पनांच्या अनुरोधाने मांडल्या गेल्या आहेत. ह्या उपपत्ती विनोदाच्या निर्मितिप्रक्रियेवर व स्वरूपावर कितपत यथार्थ प्रकाश टाकतात, हे पाहता येईल.

कोणतीही साहित्यकृती अपरिहार्यपणे मानवी जीवनातील अनुभवाचे चित्रण करीत असते. साहित्यातून आविष्कृत होणारा हा जीवनानुभव म्हणजेच कलाकृतीचा आशय होय. अनुभवाच्या मूलभूत स्वरूपावरून वाङ्मयकृतीत चित्रित होणाऱ्या अनुभवांचे शोकात्म आणि सुखात्म असे दोन प्रकार पडतात व ते वाचकांच्या ठिकाणी शोकात्म वा सुखात्म स्वरूपाची जाणीव निर्माण करतात. काही अनुभव संमिश्र असतील, काही अनुभव एकच एक विशिष्ट भावनिक परिणाम साधत नसतील, तरीही शोकात्म आणि सुखात्म असे जावनाविषयक अनुभवाचे दोन मूलभूत प्रकार आहेत, असे विधान करावे लागते. कारण हे दोन्ही मानवी जीवितप्रेरणेशी निगडीत असतात. माणसाची जीवनेच्छा, जीवितप्रेरणा जेव्हा पराभूत होते, जीवनच विनाशाकडे अपरिहार्यपणे जाते, जीवनविरोधी शक्ती प्रबळ होतात असे चित्रण केले जाते, तेव्हा जीवनविषयक शोकात्म जाणिवेची प्रतीती येते. उलट जेव्हा माणसाची जीवन जगण्याची इच्छा अथवा जीवितप्रेरणा चित्रित केली जाते, त्याच्या ईप्सितांची प्राप्ती, इच्छांची परिपूर्ती चित्रित होते, तेव्हा जीवनविषयक सुखात्म स्वरूपाची जाणीव निर्माण होते. म्हणून जीवनविषयक शोकात्म आणि सुखात्म अनुभव हे मूलभूत स्वरूपाचे वर्गीकरण मानावे लागते. या अनुभववैशिष्ट्याने वाचकाच्या ठिकाणी निर्माण होणारी जाणीव शेकात्म की सुखात्म, हे ठरते. ही जाणीव निर्माण करणारा अनुभव हा कालकृतींचा आशय होय.

आशयाला महत्त्व देऊन मांडल्या गेलेल्या विनोदनिर्मितिविषयक उपपत्तींमध्ये व्यंगकल्पना ही एक प्रभावी कल्पना असल्याचे दिसून येते. विनोदाची निर्मिती ही कोणत्या ना कोणत्या तरी व्यंगाचे दर्शन झाल्याने, चित्रण केल्याने होते, असे व्यंगकल्पनेला महत्त्व देऊन मांडल्या गेलेल्या विनोदविषयक उपपत्तीचे सूत्र दिसून येते. काही उपपत्ती ह्या सामान्य स्वरूपात व्यंग हे विनोदनिर्मितीचे कारण असल्याचे सांगून विनोदनिर्मितीची प्रक्रिया विशद करतात...

No comments:

Post a Comment

Featured Post

              राजा  भगवंतराव ज्यू कॉलेज११ वी १२ वी कला व विज्ञान शाखेत शिकत असणार्या विध्यार्थ्यासाठी आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विषयची लिंक...