Reach With Information AS A Guideline To Help The Students Throw The Different Links For Share Knowledge
Sunday, July 26, 2015
अभ्यास करण्याचे काही नियम: • स्वतःवर विश्वास ठेवा आणि ध्येय ठरवा. • वेळापत्रक बनवा व त्याप्रमाणे वागा. • जे महत्त्वाचे आहे त्याच्यासाठी वेळ खर्च करा. • चुकांना घाबरू नका. त्यातून बरेच काही शिकता येते. • आपली जास्तीत जास्त बुद्धीमत्ता शैक्षणिक साधने बनविण्यासाठी वापरा. • कमीत कमी वेळेत आपल्याला जास्तीत जास्त काम कसे करता येईल याचे व्यवस्थापन करायला शिका. • वर्षभरातले रोजचे अभ्यासाचे वेळापत्रक बनवून त्याचे कटाक्षाने पालन करावे. • २४ तासांपैकी ८ तास झोप + ६ तास शाळा + १ तास जेवण + १ तास इतर + २ तास खेळणे असं एकूण वेळापत्रक असलं तरी ५-६ तास उरतातच. हा वेळ पूर्णपणे मन लावून अभ्यासाला दिला तर वर्षभर अभ्यासाची छान तयारी होते. • दिवसाचा सगळा वेळ नीट वापरला तर रात्री जागरण करून अभ्यास करण्याची वेळ येतच नाही. • वेळापत्रकात प्रत्येक विषयाला वेळ दिलं गेला पाहिजे. अवघड वाटणाऱ्या विषयांना जास्त वेळ द्यावा. • पाढे, सूत्रे, व आकृत्या यांना वेगळा वेळ देऊन विशेष तयारी करावी. • उत्तरे पाठ करू नयेत. आपल्या भाषेत मुद्द्यांमध्ये प्रश्नांची उत्तरे लिहून काढावीत. इंग्रजीचे स्पेलिंग, अर्थ पाठ करावेत. विज्ञानाच्या व्याख्या पाठ कराव्यात. गणिते सोडवावीत. सखोलपणे तो धडा अभ्यासावा. • आळस, अस्थिरता, तुलना व न्यूनगंड टाळा आणि ‘मला येतच नाही,’ असे न समजता ‘प्रयत्न केले तर मला नक्कीच येईल,’ ही पक्की भूमिका मनात बाळगा. • टी.व्ही. मोबाईल, ऑडिओ, सी.डी. या गोष्टी पूर्णतः बंद असाव्यात. • एकदा अभ्यासासाठी ठरवलेली वेळ दुसऱ्या कोणत्याही आणि कितीही महत्त्वाच्या कामाला देता कामा नये. • अभ्यासाच्या वेळी फक्त अभ्यासच करावा. जेवण किंवा टी.व्ही. पाहणे असे दुसरे कोणतेही काम करू नये. • आपल्याला अभ्यासासाठी असलेले एकूण विषय आणि अभ्यास करण्यासाठी लागणारा वेळ याचा मेल घालण्यासाठी वेळापत्रक तयार करणे आवश्यक असते. अभ्यास करताना या गोष्टी टाळा: • रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणे. • अभ्यास करीत असताना काही खाण्याची किंवा चघळण्याची सवय असणे. • अभ्यास करीत असताना संगीत ऐकणे. • झोपून किंवा चालत-फिरत पडून अभ्यास करणे. मुलांच्या अभ्यासात पालकांची भूमिका: मुलांना अभ्यासाची सवय लावण्यासाठी पालकांना बरेच परिश्रम घ्यावे लागतात. धाक दाखवून, चोप देऊन मुलांना अभ्यासाला बसविणाऱ्या पालकांनी सर्वप्रथम हे लक्षात ठेवावे कि, मुलांना अभ्यासाची गोडी लावण्याचे उद्दिष्ट त्या मार्गाने कधीही साध्य करता येत नाही. त्यासाठी मुलांच्या अगदी बालपणापासूनच आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. • भूगोल, इतिहास, विज्ञान यांसारख्या विषयांत नकाशे, आकृत्या, फोटोग्राफ्स, कॅसेट्स, व्हिसीडीज आणि सिडीजच्या साहाय्याने आपण त्यांच्या मनात अभ्यासाची गोडी निर्माण करू शकता. • मुलांना अभ्यासाचे दडपण वाटेल असे पालकांनी वागू नये. • वारंवार परीक्षेचे स्मरण करून देऊन मुलांमध्ये दहशत निर्माण होईल असे वागू नये. त्यांना सतत दिलासा देत राहावे. • पाल्य समोर दिसताच त्यांना फक्त अभ्यासाविषयी विचारणे, त्यांच्या मनावर अभ्यासाचे दडपण निर्माण करणे, शिक्षेची दहशत निर्माण करणे, नकारार्थी आणि निराशावादी बोलणे, पदोपदी अपमानित करणे या गोष्टी पालकांनी आवर्जून टाळाव्यात. • पालकांनी मुलांच्या बाबतींत, त्यांच्या कुवतीप्रमाणे रास्त अपेक्षा बाळगण्यात आणि त्या पूर्ण होतील यासाठी अधिकात अधिक सोयी सुविधा त्यांना पुरवाव्यात, त्यांचे कौतुक करावे व त्यांना प्रोत्साहित करावे त्यांची पाठराखण करावी. • मुलांचे विषय शिक्षक, वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापक यांना पालकांनी नियमित भेटायला हवे. • दिनचर्या आखणे, नियोजन करणे, वेळापत्रक तयार करणे, वेळापत्रकाची अंमलबजावणी करणे, मार्गदर्शन करणे यांसारख्या बाबींसाठी पालक आपल्या पाल्यांना मदत करू शकतात. • अभ्यास आणि परीक्षेतील यश याबाबत पालकांनी मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत, तसेच आपल्या अपेक्षांचे मुलांच्या मनावर फार ओझे होणार नाही, याचीही काळजी पालकांनी घ्यावी. • मुलांना एखाद्या विषयात आवड कशी निर्माण होईल हे बघणे शिक्षकाचे आणि पालकांचे प्रथम कर्तव्य असते. त्या विषयाच्या अभ्यासासाठी त्यांची उत्सुकता जागृत करण्याचे मार्ग आपण खुले करायचे असतात. त्यांना योग्य सुविधा, योग्य परिसर, योग्य वातावरण उपलब्ध करून द्यायचं असतं. आपल्या इच्छा-आकांक्षा त्यांच्यावर लादायच्या नसतात. त्यांच्या आवडीनुसार त्यांना त्यांचे मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. • गणित या विषयाचा अभ्यास करताना मुलांनी सूत्रांची सिद्धता समजून घेतली पाहिजे. ते सूत्र नीट कळले नसेल तर ते तोंडपाठ करून काही फायदा नसतो. गणितातील उदाहरणे, प्रमेय, समस्या मुलांनी स्वतः सोडविल्या पाहिजेत. त्यावर चिकित्सक पद्धतीने चिंतन केले पाहिजे. सिद्धतेवर स्वतः नवीन पर्याय व मार्ग शोधले पाहिजेत. • विज्ञान विषयाचा अभ्यास हा प्रयोग, निरीक्षण, विश्लेषण, आकृत्या, तुलना-विरोध-साम्य-स्पष्टीकरण अशा टप्प्यांनी करावयाचा असतो. मुलांना स्वयंअध्ययन आणि स्वयंमूल्यमापनाचे तंत्र जमले पाहिजे. • सामाजिकशास्त्रांचा अभ्यास करताना मुलांनी नकाशा, चित्रे, संदर्भ ग्रंथ, इतर पूरक पुस्तके, वर्तमानपत्रातील लेख यांचा उपयोग करून स्वतःच्या नोट्स (टिप्पणी) काढल्या पाहिजेत. • परीक्षेची किंवा एखाद्या विषयाची किंवा विषयातील एखाद्या भागाची भीती वाटत असेल तर त्या भीतीने घाबरून जाऊ नका. घाबरल्यामुळे आत्मविश्वास कमी होतो. • सारख्या तक्रारी करू नका किंवा परिस्थितीला दोष देत बसू नका. त्याऐवजी आपला वेळ ती समस्या सोडवण्यासाठी खर्च करा. उत्तरे शोधण्याची सवय लागली कि तक्रारी करण्याची नकारात्मक सवय आपोआप कमी होते. • नियमित अभ्यास जसा महत्वाचा आहे, तसा नियमित व्यायाम सुद्धा महत्वाचा आहे. व्यायाम करणे म्हणजे वेळ वाया घालवणे नव्हे. आपले शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राखणे हे आपले कर्तव्यच आहे. • अति विचार करण्यात फार वेळ वाया जातो आणि शक्ती खर्च होते. त्यामुळे नुसताच विचार करण्यापेक्षा कृती करणे नेहमीच श्रेष्ठ असते. आपला मेंदू – जगातला अद्वितीय सुपर कॉम्पुटर – मेंदूचा वापर आपण सगळेच करत असतो. पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे, मेंदूच्या संपूर्ण क्षमतेचा वापर कुणीच करत नाही. जगातील अत्यंत बुद्धीमान व्यक्तींनी सुद्धा आपल्या मेंदूचा संपूर्ण वापर केलेला नाही. जसा जसा मेंदूवरील ताण वाढत जातो तसतशी मेंदूची कार्यक्षमता कमीकमी होत जाते आणि मेंदूला थकवा येतो. कुणीतरी आपल्यावर अभ्यास करण्याची सक्ती करत आहे, अशा मानसिकतेमध्ये राहून अभ्यास करायला सुरुवात केली तर आपला मेंदू आपल्याला मदत कशी करेल ? अभ्यास करणे हि माझी गरज आहे, मी अभ्यास केल्याशिवाय माझ्या आयुष्यातील ध्येय साध्य करणे मला कठीण होईल, अशी मानसिकता ठेवली पाहिजे. अभ्यास कमी वेळ करा पण जेवढा कराल तेवढा आनंदाने करा. आपला मेंदू ही आपल्याला मिळालेली खूप मोठी आणि मौल्यवान देणगी आहे. तिचा जास्तीत जास्त वापर करणे हे आपल्या हाती आहे. मेंदू आपली खूप कामे सहजरीत्या करू शकतो. पण जर आपण त्याचा नियमितपणे वापराच केला नाही तर मेंदूच्या क्षमता कमी होतात आणि ऐनवेळी मेंदू आपल्याला साहाय्य करू शकत नाही. अभ्यास किंवा कोणतेही काम सातत्याने केले पाहिजे असे मोठी माणसे आपल्याला सांगतात, त्यामागे हेच कारण असते. आपली बुद्धिमत्ता जरी चांगली असली आणि आपण खूप हुशार आहोत असे आपल्याला वाटले तरीसुद्धा योग्य दिशेने कष्ट केल्याशिवाय यश मिळू शकत नाही, हि गोष्ट सदैव लक्षात ठेवावी. आपल्याला बुद्धीला कष्टांची जोड मिळणे अत्यंत आवश्यक असते. अतिशय उत्तम गुलाबाचे झाड चांगल्या प्रतीचे खत आणि नियमितपणे पाणी घातल्याशिवाय जगू शकत नाही, तसेच आपल्या बुद्धीचे आहे. विविध प्रकारची कोडी सोडवत राहणे, शब्दकोडी सोडवणे, चित्र पाहून त्याचे वर्णन करणे, गणितीय कोडी, तुकडे जोडून चित्र तयार करणे, दोन चित्रांमधला फरक ओळखणे, गटात न बसणारा शब्द ओळखणे, एकाच वेळी अनेक गोष्टी लक्षात ठेवायचा प्रयत्न करणे, अतिशय वेगात आणि अचूक लिहिण्याचा प्रयत्न करणे, अतिशय वेगात आणि अचूक वाचन करण्याचा प्रयत्न करणे, एखाद्या विषयाशी संबंधित असणारे आणि आपल्याला आठवणारे शब्द विशिष्ट वेळात लिहून काढणे, मुद्दे तयार करून त्यावरून गोष्ट लिहिणे किंवा एखाद्या गोष्टीचे लहान लहान मुद्द्यांमध्ये रुपांतर करणे, एकाच वाक्याचे मराठी-हिंदी-इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये भाषांतर करणे अशा क्रिया सतत करत राहिल्याने आपला मेंदू अधिक कार्यक्षम होतो आणि अचूक काम करण्याची सवय लागते, मेंदूच्या विचार करण्याच्या पद्धतीला एक प्रकारची शिस्त लागते. अतिशय शांत वातावरणात, एकाग्र अवस्थेमध्ये, लक्षपूर्वक काम करत राहिल्यास नेहमीच फायदा होतो आणि आपल्या कामाचा प्रभावी परिणाम लवकर दिसून येतो. त्यामुळे कोणतेही काम करताना आपल्या मनामध्ये दुसरे विचार येऊ न देता आणि गडबड गोंधळ न करता शांतपणे काम करत राहणारी माणसे नेहमीच यशस्वी होताना दिसतात, कारण आपल्या मेंदूला नेमके कामाला कसे लावायचे हे त्यांना अगदी व्यवस्थित समजलेले असते. आपल्या मेंदूला उत्तम स्थितीमध्ये ठेवायचे आहे ना ? मग या गोष्टी आचरणात आणायला हव्यात • नियमित आणि वेळच्या वेळी आहार घ्यायला हवा, गरज नसताना उपाशी राहून काहीही फायदा होत नाही. • ताजी फळे खा. • हिरव्या पालेभाज्या, आणि कडधान्ये यांचा समावेश रोजच्या जेवणामध्ये असायला हवा. • पिझ्झा, बर्गर, बेकरीचे पदार्थ,मैदा घातलेले पदार्थ कटाक्षाने टाळायला हवेत. • फ्रीजमध्ये अनेक दिवस ठेवलेले अन्न पुन्हा पुन्हा गरम करून खाऊ नये कारण त्याने पोट तर भरते, पण शरीराला पोषक असणाऱ्या गोष्टी मिळू शकत नाहीत. • भरपूर पाणी प्यावे. बऱ्याच व्यक्ती पाणी फारच कमी पितात, त्यांना या सवयीचा पुष्कळ त्रास पुढे सहन करावा लागतो. • बाजारात मिळणारे रेडी टू इट प्रकारचे अन्नपदार्थ मुळीच खाऊ नयेत. • घराचे लोणी, साजूक तूप यांचा आपल्या आहारात समावेश असणे अत्यंत महत्वाचे आहे. • प्रमाणाबाहेर आहार टाळायला हवा, आणि आवश्यकतेपेक्षा कमी आहार घेणेसुद्धा टाळायला हवे. या दोन्ही गोष्टी सारख्याच प्रमाणात धोकादायक असतात. • चहा-कॉफी, कोल्डकॉफी अशा पदार्थांचे सेवन करणे टाळायला हवे. पाच पायरी अभ्यास पद्धती : पहिली पायरी: निरीक्षण, सर्वेक्षण, पाहणी, ओळख करून घेणे. • ज्या प्रकरणाचा/विषयाचा अभ्यास करायचा आहे, त्याचे वाचन करण्यापूर्वी त्याची प्राथमिक ओळख करून घ्यावी. • शीर्षक, मजकुरांचे विभाग-उपविभाग, उपशीर्षके, ठळक मुद्दे, आकृत्या, चित्रे, शब्द, तांत्रिक संज्ञा, व्याख्या, आलेख यांची ओझरती नोंद घेत-घेत त्या प्रकरणाच्या शेवटच्या वाक्यापर्यंत पाहणी करावी, सारांश वाचावा. पायरी दुसरी: प्रश्न निर्माण (Questions) अभ्यास घटक ओझरते चालून झाल्यानंतर: • वर्णन करा, तुलना करा, फरक स्पष्ट करा, रिकाम्या जागा भरा, कारणे सांगा, चूक कि बरोबर ते सांगा अशा प्रश्नांचा विचार करावा. पायरी तिसरी: वाचन (Reading) • मन एकाग्र करून संपूर्ण प्रकरण सविस्तर वाचावे. • वाचताना योग्य जागी खुणा कराव्यात. मुख्य मुद्दे टिपून ठेवावेत. • वाचून झाल्यावर धड्याचा सारांश तक्ता (Summary Chart) लिहावा. पायरी चौथी: मनन (Recalling) • वाचलेला भाग आठवून पाहावा. • आपल्याला किती समजले ते पाहावे. • ठराविक मुद्दे क्रमवार आठवून किती लक्षात राहिले ते तपासून पाहावे. • वर्गात प्रत्येक तासाला काय शिकलो, दिवसभर काय वाचले याचे स्मरण करावे. पायरी पाचवी: उजळणी (Revision) • वाचलेला मजकूर स्मृतीत पक्का करण्यासाठी अधूनमधून पुन्हा वाचणे. • मुख्य मुद्दे, व्याख्या, सूत्रे, सारांश व तक्त्यांवर वारंवार नजर फिरवावी. • विविध अनुभवांतून ज्ञान मिळविण्याने, अनुभवातून शिकल्याने, सखोल विचार केल्याने, कल्पना केल्याने, बदलणाऱ्या परिस्थितीला तोंड दिल्याने, ऐकताना, पाहताना, कृती करताना अर्थ नीट समजून घेतल्याने बुद्धीचा विकास होतो आणि अशा बुद्धीने अभ्यास होतो. • सातत्य आणि सराव या दोन बाबी स्वयंअध्यनासाठी अतिशय आवश्यक आहेत. वाचन, लेखन, आकलन, स्मरण, उपयोजिता या सर्व क्षमतांचा सातत्याने आणि नियमित स्वरुपात वापर केला कि त्या विकसित होतात. परीक्षा जवळ येते तेव्हा – परीक्षा हि आपल्या फायद्याचीच गोष्ट आहे आणि आपल्यासाठीच केलेली आहे. आपल्याला परीक्षा टाळून किंवा परीक्षेपासून लांब जाऊन यश मिळणार नाही. त्यामुळे मनामध्ये कुठलीही भीती न बाळगता आणि नकारात्मक विचार न आणता परीक्षेला सामोरे जायला हवे. अभ्यास करणे आणि परीक्षा या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, अभ्यास करताना परीक्षेचा विचार अजिबात करायचा नाही आणि परीक्षा देताना फक्त उत्तम गुण कसे मिळतील यावरच आपले लक्ष केंद्रित करायला हवे. अनेक मुलांची या दोन्ही गोष्टींमध्ये फारच गडबड होते आणि यश मिळत नाही. अभ्यास करताना फक्त उत्तमरित्या अभ्यास करणे आणि पेपर लिहिताना मन एकाग्र करून अतिशय उत्तम आणि अचूक उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करणे हे पथ्य पाळावे, म्हणजे परीक्षा आणि अभ्यास या दोन्ही गोष्टींची भीती वाटणार नाही. परीक्षेची तयारी करण्याची अभिनव पद्धत – आपण नेहमी परीक्षेची तयारी कशी करतो? धडा किंवा कविता वाचतो, महत्वाच्या गोष्टींचे पाठांतर करतो आणि धड्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहून काढतो. पुष्कळ प्रमाणात शिक्षकसुद्धा हेच प्रश्न गृहपाठ म्हणून सोडवण्यास सांगतात. त्यामुळे अभ्यास करणे म्हणजे धड्याखालील प्रश्नांची उत्तरे तयार करणे असा समज विद्यार्थ्यांमध्ये झालेला दिसतो. बरोबर ना? हि पद्धत काही प्रमाणात योग्य असली तरी पुरेशी नाही. धड्याखालील प्रश्न हे आपल्याला मार्गदर्शक प्रश्न म्हणून दिलेले असतात. तेच प्रश्न परीक्षेला येतील याची कुठलीही खात्री देता येत नाही आणि त्याच प्रश्नांची उत्तरे घासून घासून तयार केली म्हणजे माझा धडा तयार झाला असेही ठामपणे सांगणे धोक्याचे असते. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.. परीक्षेचा पेपर कसा तयार करायचा ? त्यामध्ये कोणते प्रश्न टाकायचे ? कोणत्या प्रश्नांना महत्व द्यायचे ? याचे संपूर्ण स्वातंत्र्य पेपर सेट करणाऱ्या शिक्षकांना आहे.त्यामुळे शिक्षक त्या विशिष्ट पाठावर आधारित असणारे कोणतेही प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये समाविष्ट करू शकतात. मग अभ्यास करताना कुठलीतरी नमुना प्रश्नपत्रिका मिळवून त्यावर आधारित अभ्यास करण्यापेक्षा आपणच का आपली स्वतःची प्रश्नपत्रिका तयार करू नये? हे तंत्र तुमच्यासाठी नवे असले तरी फारच उपयोगाचे ठरणारे आहे. हे तंत्र वापरताना नेमके काय करायचे आहे? ते पहा – धडा नीट वाचून काढा, प्रत्येक ओळ वाचा, अगदी चौकटीमध्ये दिलेली सगळी माहिती वाचा. आता हे पक्के लक्षात असू द्यात कि यापैकी कोणत्याही माहितीवर आधारित प्रश्न पडू शकतो. आणि आपल्याला त्या प्रश्नाचे उत्तर नीट सोडवता आले पाहिजे. सर्वप्रथम फक्त रिकाम्या जागा भरा या प्रकारचे प्रश्न तयार करा, तुम्हाला शक्य होतील तितके.. धडा जितका मोठा तितके प्रश्न जास्त.. जितके मुद्दे जास्त असतील तितक्या रिकाम्या जागा सुद्धा जास्त असणारच.. आता ती यादी तयार करा. यानंतरचा प्रश्न म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिहा.. आता काम आणखीनच सोपे आहे. रिकाम्या जागा भरा या तयार करा. जितकी जास्त वाक्ये तितके प्रश्न जास्त.. आता आपण पुढे जाऊया.. व्याख्या लिहा.. प्रत्येक व्याख्येवर आधारित व्याख्या लिहा हा प्रश्न तयार होईल. झाले कि नाही काम ? आता अनुक्रमे थोडक्यात उत्तरे लिहा आणि सविस्तर उत्तरे लिहा या प्रश्नांची यादी केली कि झाला तुमचा पेपर तयार. माझ्या पालक मित्रांनो, हे मात्र जरूर लक्षात घ्या.. • अभ्यासक्रमातील एखादा विषय अवघड वाटत असेल तर, तो टाळण्याऐवजी त्या विषयाचा सतत पिच्छा पुरवावा. सतत पिच्छा पुरविल्यामुळे तो विषय सोपा वाटायला लागतो. • ठराविक इयत्तेतील अभ्यास त्याच इयत्तेत मुलांना समजणे व येणे अतिशय महत्त्वाचे आहे. पाहिली ते चौथीच्या प्राथमिक शिक्षणात गणित, इंग्रजी, मराठी व इतर विषयांचा पाया पक्का व्हायला हवा. • बरीच मुले सातवी, आठवी इयत्तेत शिकतात; पण त्यांना तिसरी-चौथीचे गणित वा इंग्रजी येत नाही ही वस्तुस्थिती बऱ्याचदा आढळते. मग खूप धडपड करूनही ती मुले सातवी-आठवीत मागेच पडतात. पर्यायाने अपयश येतं. • प्राथमिक शिक्षणात आपण मागे तर पडत नाहीना यासाठी दक्ष राहायला हवे. विशेषतः पालकांनी विशेष सावध राहायला हवे. • गणित, विज्ञान, भाषा या विषयांचा पाया पक्का होण्यासाठी प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. • नियमितपणा ही अभ्यासातील महत्त्वाची बाब आहे. अभ्यासातील नियमितपणामुळे ठरलेल्या वेळी अभ्यास करायला मेंदू तयार असतो. कार्यक्षम असतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured Post
राजा भगवंतराव ज्यू कॉलेज११ वी १२ वी कला व विज्ञान शाखेत शिकत असणार्या विध्यार्थ्यासाठी आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विषयची लिंक...
-
EN GLIS H Y UVAKBHARATI Standard - XII BBIG TV CH 22 29 9954 The Coordination Committee formed by G.R. No. Abhyas - 2116/(Pra.Kra.43/...
-
"The Raja of Aundh" A short story by G. D. Madgulkar Translated by Vinaya Bapat. I had seen the Raja. He was never so pompous ...
-
Std. XI (Marks: 50) Time- Two and Half Hours Section I- Prose Q.1 (A) Read the extract and complete the activities given below. ...
No comments:
Post a Comment