Reach With Information AS A Guideline To Help The Students Throw The Different Links For Share Knowledge
Friday, July 31, 2015
कळण्याची दृश्य-वळणे
Aug 01, 2015
महेंद्र दामले
चित्रातली प्रतिमा कुठचीही असो ती एकच कार्य करते! आपल्याला ही जाणीव करून देते की, आपण कसं पाहिलं, पाहात आहोत आणि त्यावरून आपली मानसिक स्थिती काय आहे! याच कारणाने आपले सर्व देव मानवरूपात आपल्याला सामोरे असतात. भारतात कुठच्याही धर्माच्या दृष्टीने पवित्र, प्रार्थनीय स्थळाकडे जा! तेथील वास्तूमध्ये जा, त्या वास्तूच्या केंद्रभागाला खूप महत्त्व असते. त्या केंद्रभागात, धर्मानुसार महत्त्वाची, पवित्र, दर्शन घ्यावी, पूजनीय अशी एखादी वस्तू असते. त्या वस्तूसमोर येऊन तिला पाहणं, तसंच त्या वस्तूभोवती प्रदक्षिणा घालणं याकरता जागा तयार केलेली असते. पवित्र वस्तूसमोर येऊन तिला पाहणं याला धार्मिक परिभाषेत ‘दर्शन’ म्हणतात. रोज किंवा काही दिवसांच्या अंतराने ‘दर्शन’ घेण्याला धर्मात महत्त्व असतं. अशा सवयींना सांस्कृतिक महत्त्व असतं. अशा सवयी असणाऱ्या लोकांना विचारा की, या पवित्र वस्तूचं दर्शन समोरून मिळालं नाही, कडेनं मिळालं तर चालतं का? काय वाटतं? बहुतेक जण हेच उत्तर देतील की, दर्शनाचं, पाहण्याचं समाधान मिळत नाही. त्यामुळे कितीही गर्दी असो, पवित्र, प्रार्थनीय वस्तूला समोरूनच पाहायचंय, ‘सामोरं’ जायचंय. अशा प्रकारे महत्त्वाचा अनुभव, (धार्मिक स्वरूपाचा) ‘सामोरं’ जाऊन घेणं याला आपल्या संस्कृतीत खूप महत्त्व आहे. ते महत्त्व अधोरेखित करणारी एक घटना-कथा आपण पाहू या. कर्नाटकात १६व्या शतकात श्री वादीराजा राज्य करत होते. त्यांच्या राज्यात उडुपी गावी श्रीकृष्णाचं अतिप्राचीन मंदिर होतं; आहे. श्री मध्वाचार्याचा संबंध असलेलं ते अतिशय पावन मानलं जाणारं मंदिर आहे. ‘कनकदास’ हे संत, त्यांच्या कृष्णभक्तीबद्दल प्रसिद्ध होते. ते एकदा उडुपी येथे आले. पण त्या काळातील सामाजिक चालीरीतींनुसार, त्यांच्या जातीमुळे त्यांना श्रीकृष्ण मंदिरात प्रवेश नव्हता. पण त्यांची भक्ती इतकी प्रसिद्ध होती की, वादीराजांनी त्यांना मंदिराच्या मागच्या बाजूला एक कुटी बांधून दिली. कनकदास रोज आपला तंबोरा घेऊन भजनं म्हणत. त्यांच्या व त्यांच्या प्रिय कृष्णामध्ये भिंत होती. परिणामी कनकदास आपल्या अंतर्मनात कृष्णाचं दर्शन घेत असं मानलं जातं. एके रात्री भूकंप झाला. मंदिराच्या भिंतीला भेग, भगदाड पडलं. त्यातून कनकदास कृष्ण मंदिर, मूर्ती पाहू शकले. वादीराजांनी या घटनेला एक संकेत म्हणून पाहिले. भिंतीचं भगदाड भरून काढण्याऐवजी तिथे एक खिडकी बांधली. ज्यातून कनकदास प्रिय श्रीकृष्णाचं दर्शन घेऊ शकले. वादीराजांनी अशी प्रथा पाडली की ते स्वत:ही जेव्हा या मंदिरात यायचे तेव्हा सर्वप्रथम या खिडकीतून श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन मग मंदिरात प्रवेश करायचे. त्यानंतर सर्व पीठांच्या अधिकाऱ्यांसह, सर्व भक्त ही प्रथा आजही पाळतात. कनकदासांसाठी बनवलेल्या खिडकीतून, ‘कनकनदिंडी’तून दर्शन घेतात. सामोरं जाणं, दर्शन घेणं याचं महत्त्व अधोरेखित करणारा मुद्दा सांगणारा तपशील असा की हिंदू मंदिरात मूर्ती नेहमी पूर्व दिशेला तोंड करून, ‘पूर्वाभिमुख’ असते तशीच ती उडिपी मंदिरातही होती, पण कनकदासांसाठी श्रीकृष्ण या खिडकीकडे तोंड करून उभे राहिले. पूर्वेकडे पाठ करून मूर्ती ‘पश्चिमाभिमुख’ झाली. आजही आहे. ज्यामुळे कनकदास श्रीकृष्णाचं ‘दर्शन’ सामोरं जाऊन, समोरून घेऊ शकले. यावरून आपल्या संस्कृतीत सामोरं जाऊन दर्शन घेणं, पाहणं याचं महत्त्व किती आहे ते स्पष्ट होईल. वस्तू समोरून पाहिल्यामुळे काय होतं? समोरून पाहण्याचं नक्की काय महत्त्व आहे? आपल्या सभोवतालच्या जगात वस्तू अस्तित्वात आहेत हे आपल्याला ‘माहीत’ असतं. आपण जेव्हा एखादी वस्तू आपल्यासमोर आणतो तेव्हा ती वस्तू व आपण यात वेगळ्या पातळीवर देवाण-घेवाण सुरू होते. आपण एखादी वस्तू आपल्या हातात घेऊन किंवा समोर ठेवून बघू लागतो, तेव्हा त्या वस्तूचं आपण माहितीमधून अनुभवात रूपांतर करतो. त्याचा रंग, आकार, आकारमान, पोत, स्पर्श, गंध, वजन, त्याच्यावरचा छायाप्रकाशाचा परिणाम, त्याला हाताळल्यावर निर्माण होणारा ध्वनी, तापमान अशा गोष्टींचा अनुभव आपण घेऊ लागतो. हा अनुभव अनेक संवेदनांनी युक्त असल्याने अनुभव घेण्याचा कालावधी खूप असतो; असू शकतो. काही काळ आपण फक्त अनुभव घेत राहतो. त्याबद्दल मतं बनवत नाही; बनवू शकत नाही. अशा प्रकारे अनुभव घेताना आपल्या मनात काही भावनाही निर्माण होतात. या सर्व अनुभवाची प्रक्रिया प्रत्यक्षात, वर्तमानकाळात होत असते. एकाअर्थी तो अनुभव 'लाइव्ह' असतो. समोरून वस्तू पाहण्याची प्रक्रिया आपणाला वर्तमानकाळात, प्रत्यक्षात घेऊन येते. अनुभव घेण्याच्या अवस्थेत आपण राहतो. जेव्हा वस्तू आपल्या समोरून निघून जाते, बाजूला सरते तेव्हा ती वर्तमानकाळातील ‘अनुभवातून’ भूतकाळातील ‘माहिती’मध्ये रूपांतरित होते. माहिती आपल्याला भूतकाळात ज्ञात झालेली असते, म्हणूनच आपण बोलताना म्हणतो, ‘माहिती आहे!’ म्हणजेच पूर्वी, अगोदरच, भूतकाळात माहिती झाले आहे. वस्तू समोर ठेवून वर्तमानकाळात पाहताना आपले डोळे व मेंदू, वर उल्लेखिलेल्या संवेदनांचे, सपाट नकाशाप्रमाणे असलेले संवेदनापट बनवत असतात. या संवेदनापटांना आपण ‘प्रतिमा’, दृश्य प्रतिमा असेही म्हणतो. मेंदू वस्तूच्या संवेदनानुभवांना ज्या पद्धतीने नकाशाप्रमाणे साठवतो व ते सपाट असतात, तसेच चित्र द्विमितीत असल्यामुळे, प्रतिमा या सपाट असतात. प्रतिमा सपाट झाल्यामुळे दोन गोष्टी होतात. एक म्हणजे त्या आरशाप्रमाणे काम करतात. म्हणजे आपले डोळे चेहऱ्याच्या समोरच्या बाजूला असतात. परिणामी डोळ्यासमोर, डोळ्यांच्या दृष्टिक्षेपात गोष्टी आणून, पाहून, समजून, ज्ञान घेऊन आपण कृती करतो. आपल्याला जेव्हा स्वत:चा चेहरा, शरीर याचं निरीक्षण करून ज्ञान, भान मिळवायचं असतं तेव्हा स्वत:चा चेहरा, शरीर यांना आपल्याच डोळ्यापुढे आणण्याकरिता आपण आरसा वापरतो. आरसा जरी प्रतिबिंब दर्शवत असला तरीही त्याचे मुख्य कार्य ‘भान’ निर्माण करणं आहे. म्हणूनच आपल्याला आपल्या शरीराच्या इतक्याच मोठय़ा आरशाची गरज भासते. व्यायामशाळांत, पाश्चात्त्य शैलींच्या नृत्याच्या वर्गात प्रशिक्षक व भिंतीएवढे आरसे यांचं एकच काम असतं, भान निर्माण करणे! चित्रातली प्रतिमा कुठचीही असो ती एकच कार्य करते! आपल्याला ही जाणीव करून देते की, आपण कसं पाहिलं, पाहत आहोत आणि त्यावरून आपली मानसिक स्थिती काय आहे! याच कारणाने आपले सर्व देव मानवरूपात आपल्याला सामोरे असतात. पंढरीच्या विठ्ठलाकडेच पाहा ना! कटेवरी हात विटेवरी उभा असं त्याचं रूप, समोरून पाहिलं की त्याच्या उभ्या राहण्यामुळे तयार झालेल्या शरीराचा आकार, त्याचा सपाट, द्विमितपणा आपल्यासमोरच थेट तयार होऊन राहतो. त्याच्यासमोर जाऊन उभं राहिलं की तो स्वत:ला आपलीच जाणीव करून देतो. आपल्यासाठी ‘आरसा’ होतो. हीच गंमत आहे. वस्तूला समोरून पाहिलं की वस्तूचं द्विमित रूप, प्रतिमा तयार होते. ती आरशाप्रमाणे कार्य करू लागते, आपल्याला आपलं भान निर्माण करून देते. आपल्यात व त्या वस्तूत एक नातं निर्माण होतं. आपणही वस्तूला समांतर होऊन जातो. या नात्यातूनच, समांतरतेतून सपाट प्रतिमेत चैतन्य दिसून येतं. विठ्ठलाच्या मूर्तीत, शेंदूर लावलेल्या शिळेत चैतन्य जाणवू लागतं. अमूर्ताची जाणीव होते. कुठचंही चित्र व विशेष करून अमूर्त चित्र, ज्याला अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग असंही म्हटलं जातं. त्यांना पाहण्यातही हीच प्रक्रिया कार्य करत असते. अमूर्त, अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग कळत नाही असा नाराजीचा सूर लावणं साहजिक आहे. आपण पुढच्या वेळेला पाहू या की, दर्शनाच्या प्रक्रियेतून ‘अॅबस्ट्रॅक्ट’ पेंटिंग ‘समजतं’, समजू शकतं का ते.
Promoted
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured Post
राजा भगवंतराव ज्यू कॉलेज११ वी १२ वी कला व विज्ञान शाखेत शिकत असणार्या विध्यार्थ्यासाठी आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विषयची लिंक...
-
EN GLIS H Y UVAKBHARATI Standard - XII BBIG TV CH 22 29 9954 The Coordination Committee formed by G.R. No. Abhyas - 2116/(Pra.Kra.43/...
-
"The Raja of Aundh" A short story by G. D. Madgulkar Translated by Vinaya Bapat. I had seen the Raja. He was never so pompous ...
-
Std. XI (Marks: 50) Time- Two and Half Hours Section I- Prose Q.1 (A) Read the extract and complete the activities given below. ...
No comments:
Post a Comment