Sunday, July 26, 2015

बारावी निकालाच्या फुग्याला टाचणी! 25 जुलै 2015 - 06:45 AM IST पर्यावरण विषयाचे मूल्यांकन आता बाह्य परीक्षकांद्वारे मुंबई - बारावीच्या दोन वर्षे फुगलेल्या निकालाला थोडीशी टाचणी लावण्याचा निर्णय राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. अकरावी आणि बारावीसाठी पर्यावरण या विषयाच्या मूल्यमापनात यंदापासून बदल करण्यात आला आहे. कनिष्ठ महाविद्यालयांत पर्यावरण विषयात सढळ हस्ते केल्या जाणाऱ्या गुणदानावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदापासून 50 पैकी 20 गुणांचे मूल्यमापन बाहेरचे परीक्षक करणार आहेत. बोर्डाने हे परिपत्रक जारी केले आहे. पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार 2013-14 पासून बारावीसाठी हा विषय अनिवार्य करण्यात आला. 100 पैकी मिळणारे गुण पूर्वी श्रेणी स्वरूपात दिले जात; मात्र दोन वर्षांपासून त्यांचे रूपांतर गुणांमध्ये झाले. कनिष्ठ महाविद्यालये या विषयात सरासरी 40-45 गुण देऊ लागली. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेकदा प्रकल्पासाठी विनासायास चांगले गुण मिळू लागले. या प्रकारांना आता आळा बसणार आहे. पर्यावरण विषय सर्व शाखांसाठी अनिवार्य आहे. आतापर्यंत या विषयासाठी प्रत्येक सत्रात प्रकल्पासाठी 30 गुण आणि सेमिनार किंवा जर्नल अर्थात प्रयोगवहीसाठी 20 गुण अशी विभागणी होती. दोन्ही सत्रांतील एकूण 100 पैकी जे गुण विद्यार्थ्याला मिळतील त्या गुणांचे 50 पैकी गुणांमध्ये रूपांतर केले जात होते. यंदापासून हा विषय प्रथम व द्वितीय सत्रात न विभागता मूल्यमापन वार्षिक पद्धतीने होईल. म्हणजेच केवळ 50 पैकी गुण असतील. या विषयाची लेखी परीक्षा होत नाही. 50 पैकी 30 गुण प्रकल्पासाठी, तर 20 गुण सेमिनार किंवा जर्नलसाठी पूर्वीप्रमाणेच असतील; पण प्रकल्पाच्या 30 पैकी 20 पैकी गुण अंतर्गत परीक्षक, तर 10 पैकी गुण बाह्यपरीक्षक देतील. सेमिनार किंवा जर्नलच्या 20 पैकी 10 गुणांचे मूल्यांकनही बाह्य परीक्षकांमार्फत होईल. म्हणजेच 50 पैकी 20 गुणांचे मूल्यांकन बोर्डनियुक्त बाह्य परीक्षक करतील. अकरावीसाठीही हीच पद्धत लागू होणार आहे; मात्र अकरावीसाठी बाह्य परीक्षकांचे काम त्याच कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक करतील. पर्यावरण या विषयाचे मूल्यांकन योग्य पद्धतीने व्हायला हवे. विद्यार्थ्यांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा. त्यांनी सादर केलेला प्रकल्प पारखून त्यानुसारच गुण देण्यासाठी बाह्य परीक्षक नेमण्यात येणार आहेत. - गंगाधर म्हमाणे, अध्यक्ष, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

No comments:

Post a Comment

Featured Post

              राजा  भगवंतराव ज्यू कॉलेज११ वी १२ वी कला व विज्ञान शाखेत शिकत असणार्या विध्यार्थ्यासाठी आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विषयची लिंक...