Monday, October 14, 2019

*१५ आॅक्टोंबर जागतिक हात धुवा दिवस विशेष लेख...*

सृदढ, निरोगी आरोग्यासाठी हात धुवा….

संवाद तज्ञ
उध्दव फड
९७६५५८८८००

आपल्याला एखादा आजार झाला की आपण त्यावरील विविध औषधे घेतो, उपाय करतो; परंतु मुळाशी जाऊन हा आजार कशामुळे झाला असेल हे जाणून घेत नाही. आपल्याला होणार्‍या अनेक आजारांचे मूळ हे आपल्या अस्वच्छ हातांमध्ये असते. अशुद्ध, अस्वच्छ हातांनी अन्नपदार्थ हाताळल्यामुळे, खाल्ल्यामुळे अनेक जीवाणू आपल्या पोटात जात असतात आणि त्यातून विविध प्रकारच्या आजारांना आमंत्रण मिळत असते. म्हणूनच हस्तशुद्धीबाबत जागृती करण्यासाठी जगभरात 15 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक हात धुवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने उध्दव फड यांचा  हा विशेष लेख…
आपल्या जीवनात स्वच्छतेचे महत्त्व आरोग्याच्या दृष्टीने किती आहे, हे आपण सारेच जाणतो. पण कधी सकाळी उठल्यावर आपण अंथरूणातच चहा घ्यायची वाईट सवय लावून घेत आहोत. पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणातून कितीतरी घाणेरड्या सवयी आपण लावून घेत आहोत, हे मात्र खरे! आपल्या संस्कृतीने देवपूजेतही सोळा उपचार (षोडषोपचार) सांगितले आहेत. त्यात *हस्त मुख प्रक्षालयामि*। असा एक विधी सांगितला आहे.
हात धुण्याचे महत्त्व आपण नियमित पाळतोच. परंतु इंग्रजांच्या काळात किंवा जगात झालेल्या दोन महायुद्धांच्या आणि औद्योगिक क्रांतीच्या काळात तसेच नव्या सहस्रकात आलेल्या जागतिकीकरणाच्या लाटेत आमचे सगळेच संस्कार, शिष्टाचार आणि चांगल्या सवयी लयाला गेल्या असाव्यात की काय, अशी शंका येते. आधुनिकीकरणाच्या नावावर आमच्या जुन्या रीतीरिवाजांना नावे ठेवण्याची किंवा ते मोडीत काढूनच आपण जणु सुधारणावादी आहोत, असे मिरवण्याची पद्धत हिंदुस्थानात आली आहे.
एखादी गोष्ट आपल्याला पाश्‍चात्त्य देश सांगतात तेव्हा आपल्याला त्याचे महत्त्व पटते आणि आपण ते अंगीकारण्याचा अट्टहास करतो. आज 15 ऑक्‍टोबर आहे. या दिवशी संयुक्त राष्ट्रांनी आम्हाला जागतिक हात धुणे दिवस साजरा करण्याचा पायंडा पाडून दिला आहे.
संयुक्त राष्ट्र सन 2008 मध्ये या विषयी जागरूक झाले. इबोला नावाचा महाभयंकर रोग अस्तित्वात आला. आफ्रिकेत त्याने आपला प्रताप दाखवला आणि सगळे जगच सावध झाले.जागतिक हात धुणे दिवसाच्या निमित्ताने लोकांना हात धुण्याची ही चांगली सवय लागावी, त्यांच्या मनात त्याचे महत्त्व ठसवावे, या विषयी जनजागरण व्हावे, हा हेतू संयुक्त राष्ट्रसंघाने 15 ऑक्‍टोबर हा दिवस जागतिक हात धुणे दिवस म्हणून मुक्रर केला आहे. संपूर्ण दिवसभरात 15 ऑक्‍टोबर रोजी विविध कार्यक्रम घेऊन हात धुण्याविषयी तेही साबण लावून लोकांना माहिती दिली पाहिजे, असा संयुक्त राष्ट्रांचा आग्रह आहे.
या दिवसाची सुरुवात 2008 मध्ये फिलिपिन्स मधील सिटी सेंट्रल स्कूल मध्ये झाली. 2015 मध्ये लुपोत सेंट्रल एलिमेंटरी स्कूल इस्टन समार येथे हा दिवस अतिशय उत्साहाने साजरा झाला. आफ्रिकेतील इबोलाच्या साथीने संयुक्त राष्ट्राला हात धुणे दिवस साजरा करण्याची प्रेरणा दिली. योग्य आरोग्य पद्धती जनमानसात रुजविण्यासाठी आणि ही चांगली सवय जनसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी संयुक्त राष्ट्र 2008 पासून प्रयत्नशील आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचे महत्त्व जाणून हा दिवस दरवर्षी  देशभर मोठ्या प्रमाणात राबविला जात आहे.   बाहेरून आल्यावर, शौचाला जाऊन आल्यावर आणि जेवायला बसण्यापूर्वी साबणाने हात धुण्याची सवय सर्वांनी लावून घ्यावी, यासाठी संयुक्त राष्ट्रांनी मोहीम उघडली आहे. आता शालेय विद्यार्थ्यांना या दिवसाचे महत्त्व पटले आहे. काही शाळांनी शाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे प्रार्थनेच्या वेळीच हात धुऊनच शाळा सुरू करण्याची प्रथा पाडली असून ती परंपरा आता पुढे सुरू ठेवली आहे. विद्यार्थ्यांना या सवयीचे महत्त्व पटले की ते समाजात बदल घडविण्यास मदत करू शकतील, असे संयुक्त राष्ट्रांना वाटते.
साबणाने हात धुण्याची सवय लोकांना लागावी यासाठी पीपीपीओचडब्ल्य ही संस्था प्रयत्नशील आहे. या संस्थेन युनिसेफच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला आहे. या कामात त्यांना प्रॉक्‍टर अँड गॅंबल, लंडन स्कूल ऑफ हायजिन, ट्रॉपिकल मेडिसिन, युनिलिव्हर, युनिव्हर्सिटी ऑफ बुलियानो यांचे सहकार्य लाभत आहे. जागतिक बॅंक या कामासाठी मदत करीत आहे. वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन कोलॅबोरेटिव्ह कौन्सिल संयुक्तरीत्या काम करीत आहेत.

आपल्याकडे संतांनी देहाला मंदिर म्हटले आहे आणि आत्म्याला परमेश्‍वर; पण हे शरीर निरोगी असेल तरच त्या देहाचे मंदिर होऊ शकते. आजच्या भाषेत सांगायचे तर आयुष्य चांगले आणि निरोगी जगायचे असेल तर स्वच्छता महत्त्वाची आहे. त्याची सुरुवात हातांच्या स्वच्छतेपासून व्हायला हवी. कारण बहुतांश वेळा रोगांचे आजारांचे जंतू हे हातातूनच पोटात जातात. त्यामुळे रोगजंतूंपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर हात स्वच्छ धुण्याची आवश्यकता आहे. हात स्वच्छ धुतल्याने शरीर निरोगी राहते. याच प्रेरणेतून जागतिक स्तरावर हस्तशुद्धीची मोहीम सुरू झाली. आपल्याकडे प्राचीन आयुर्वेदात मुखाचे आरोग्य चांगले असेल तर एकूण आरोग्य चांगले राहते, असे म्हटले आहे. कारण, पाणी किंवा आहार हा तोंडावाटेच पोटात जातो; पण आता बदलत्या हवामानात ज्या हाताने आपण तोंडात घास घालतो ते स्वच्छ असणे ही पहिली पायरी मानली आहे. 2008 मध्ये स्टॉकहोम शहरात जागतिक पाणी सप्ताहाची परिषद भरली होती. तिथून हस्तशुद्धी मोहिमेचा श्रीगणेशा झाला. यात सामान्य जनतेचा सहभाग असण्याची गरज आहे. त्यासाठी व्यापक प्रबोधन आवश्यक आहे. त्यासाठीच 15 ऑक्टोबर हा जागतिक हस्तशुद्धी दिन म्हणून साजरा केला जातो. 2008 मध्ये तो पहिल्यांदा पाळण्यात आला. शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये हाताच्या स्वच्छतेचे बीज रुजवणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. कारण, लहान मुलांमध्ये मुळातच स्वच्छतेबाबत फारशी जागरुकता नसते. मातीतले खेळ, भटकणे, अस्वस्छतेची जाण नसणे यामुळे मुलांमध्ये स्वच्छतेच्या अभावामुळे होणारे आजार मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. याचे मूळ कारण म्हणजे मुले अन्न खाताना हात स्वच्छ धुवत नाहीत. त्यामुळेच बहुतांश शाळकरी मुलांमध्ये हगवणीसारखे पोटाचे विकार अधिक प्रमाणात होताना दिसतात. ते टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली गेली. जगभरात हात स्वच्छ न धुता अन्नग्रहण केल्यामुळे पोटामध्ये विविध जंतू जाऊन होणार्‍या आजारांमुळे दरवर्षी 35 लाख मुले दगावतात, असे काही अभ्यासकांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे अतिशय सोप्या स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले गेले. हात स्वच्छ असतील तर श्‍वसनाचे विकार आणि पचनाचे विकार यांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे गरीब आणि विकसनशील देशांत याचा प्रसार करण्यासाठी ‘युनिसेफ’ने खूप उपक्रम राबवले. त्यातून 2008 हे आंतरराष्ट्रीय स्वच्छता वर्ष म्हणून घोषित केले गेले. त्याचाच एक भाग म्हणून 15 ऑक्टोबर हा जागतिक हात धुवा दिन सुरू झाला.
*हात कधी धुवावे*
> स्वयंपाकाची तयारी करण्याआधी
>  जेवायला बसण्यापूर्वी आणि जेवण झाल्यावर
> जेवायला वाढण्यापूर्वी
> शौचालयात जाऊन आल्यावर
> मुलांचे लंगोट, कपडे बदलल्यावर
> कोणत्याही रुग्ण किंवा आजारी व्यक्तीला भेटल्यानंतर
> खोकला, सर्दी झाल्यावर नाक स्वच्छ केल्यावर
> प्राण्याला हात लावल्यावर
> केरकचरा काढल्यावर
> बाहेरून आल्यावर
> वाहनातून प्रवास केल्यावर
> पैसे मोजल्यावर
^ केस विंचरल्यावर
आपण सकाळी उठल्यावर प्रातर्विधी करून झाले की स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी हात धुतोच; पण जाणीवपूर्वक वरील सर्व वेळी हात धुतलेच पाहिजेत. त्यामुळे अर्थातच पोटात जंतू जाण्यापासून अटकाव होईल.
*हात किती वेळ आणि कसे धुवावेत*
शास्त्रीयदृष्ट्या किमान 20 सेकंद हात चोळून मग पाण्याने धुवावेत. यासाठी हात ओले करून घ्यावेत. मग हातावर पुरेसा द्रव साबण किंवा साबणवडी लावून घ्या. दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंतवून दोन्ही हाताला साबण चोळून घ्यावा. सगळीकडे नीट साबण लागल्यावर दोन्ही हातांचे तळवे, बोटं, नखं हे सर्व चांगले चोळावे. बोटांच्या मधल्या भागांतही चांगले चोळावे. त्यानंतर पाण्याने हात स्वच्छ धुवावेत आणि स्वच्छ कोरड्या टॉवेलने पुसून घ्यावेत. आपली नखे जर वाढवलेली असतील तर नखांमधील घाणही काढावी.
*पाण्याची कमतरता असल्यास*
 आपल्याकडे पाणीटंचाईची समस्या अनेकदा असते. अशा काळात सातत्याने हात धुणे शक्य नसते. प्रवासातही हा प्रश्‍न उद्भवतो. यावर सॅनिटायझर हा एक चांगला पर्याय आहे. सॅनिटायझर हातात घेऊन दोन्ही हात चांगले चोळा. बोटे, बोटांमधील भाग, नखे तसेच उलट सुलट भागांवर सॅनिटायझर लावून चांगले चोळा. या सर्व प्रक्रियेला मिनिटभराचा वेळ लागतो; पण हात सुकल्यानंतर ते स्वच्छ होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांनुसार वीस ते पंचवीस सेकंद हात चोळले तर किटाणू नष्ट होतात. त्यामुळे वेळोवेळी हात धुतले पाहिजेत.
हात सतत धुतल्याने काहींना त्वचा कोरडी झाल्यासारखी वाटू शकते. अशा वेळेला हात धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करू शकतो. साबण लावून हात चोळून कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. टॉवेलने कोरडे केल्यानंतर हाताला मॉईश्‍चरायझर लावता येईल. त्यामुळे त्वचा शुष्क होण्याची भीती राहणार नाही.
हातांची स्वच्छता ही आपल्या शारीरिक स्वच्छतेची पहिली पायरी आहे. हातांपासूनच तर रोजच्या कामांना आपण सुरुवात करतो. त्यामुळे लहानपणी आपल्याला शिकवलेल्या स्वच्छतेच्या गोष्टी आपण मुलांना शिकवताना पुन्हा आपल्या अंगी बाणवा त्यामुळे मुलांचे आणि आपलेही आरोग्य आपल्याच हातात राहील.
संतांनी म्हणून ठेवले आहे की
*‘नाही निर्मल जीवन, काय करील साबण*’ तशाच प्रकारे आता ‘करा हाताची स्वच्छता, तरच आहे जीवन निर्मल राहण्याची शक्यता’ हेही सांगितले गेले पाहिजे.
सदर लेखासाठी इंटरनेटचे संदर्भ घेतले असून शब्दांकन मी केले आहे.जे जे आपणासी ठावे,ते सकळासी सांगावे ...हा जनहितार्थ म्हणुन लेखन प्रपंच केला आहे.
🙏🏻
संवादतज्ञ
उध्दव फड
९७६५५८८८००

No comments:

Post a Comment

Featured Post

HSC english Board practice paper for study

https://online.fliphtml5.com/ykpcc/hmpl/