Wednesday, February 6, 2019

कीर्तनकार कै डॉ दत्तोपंत पटवर्धन यांनी १ कोटी सुर्य नमस्कार संकल्प केला होता त्यांनी ९६ लाख नमस्कार घातले . औंधचे राजे पंतप्रतिनिधी हे पण सुर्यनमस्काराचे पुरस्कर्ते होते .
सुर्यानमस्काराने योग --व्यायाम --आराधना या गोष्टी साध्य होतात
ही साष्टांग नमस्काराची व्याख्या होय. नमस्कार घालताना मस्तक, छाती, दोन हात, दोन पावले आणि दोन्ही गुडघे ही अष्टांगे जमिनीला प्रत्यक्ष लागतात. दृष्टी, वाणी आणि मन यांचा मानसिक उपासनेत समावेश होतो. नमस्काराला सुरुवात करताना दृष्टी समोर वा नासिकाग्राकडे ठेवली, म्हणजे मन एकाग्र होण्यास मदत होते. तत्पूर्वी सूर्यदेवतेचे ध्यान करुन काही मंत्र म्हणतात. प्रथम ॐ असा उच्चार करुन (याला ‘प्रणव’ म्हणतात) ‘ॐ मित्राय नमः’ ह्याप्रमाणे सूर्याची बारा नावे घेऊन बारा नमस्कार घालतात. ही बारा नावे पुढीलप्रमाणे : (१) ॐ मित्राय नम:, (२) ॐ रवये नम:, (३) ॐ सूर्याय नमः, (४) ॐ भानवे नमः, (५) ॐ खगाय नमः, (६) ॐ पूष्णे नमः, (७) ॐ हिरण्यगर्भाय नमः, (८) ॐ मरिचये नमः, (९) ॐ आदित्याय नमः, (१०) ॐ सवित्रे नमः, (११) ॐ अर्काय नमः व (१२) ॐ भास्कराय नमः । तेरावा नमस्कार घालताना ‘ॐ श्री सवितृ सूर्यनारायणाय नमः’ असे म्हणतात. ही एक आवृत्ती मानतात.
शिवाय ऱ्हां, ऱ्हीं, ऱ्हूं, ऱ्हैं, ऱ्हौं, ऱ्हः या सहा बीजाक्षरांचा नावांबरोबरच उच्चार करण्याचीही पद्घत आहे. उदा., ॐ ऱ्हां मित्राय नमः; ॐ ऱ्हीं रवये नम: इत्यादी. त्यानंतर दुसरे सहा नमस्कार ऱ्हां, ऱ्हीं, पहिलीच ही अक्षरे आणि सूर्याची दुसरी नावे घेऊन घालावयाचे, त्यानंतर तिसरे सहा नमस्कार ॐ ऱ्हां, ऱ्हीं मित्ररविभ्याम् नमः, ॐ ऱ्हूं, ऱ्हैं सूर्यभानुभ्याम् नमः अशी दोन बीजाक्षरे व दोन नावे एकदम उच्चारुन घालावयाचे. त्यानंतर तीन नमस्कार चार बीजाक्षरे आणि चार सूर्याची नावे घेऊन घालावयाचे (उदा., ॐ ऱ्हां ऱ्हीं ऱ्हूं ऱ्हैं मित्ररविसूर्य भानुभ्यो नमः ।). त्यानंतर तीन नमस्कार दोन वेळा सहाही बीजाक्षरे व सूर्याची बारा नावे एकत्र उच्चारुन घातले, म्हणजे एकूण चोवीस नमस्कार होतात. पंचविसावा नमस्कार ‘ॐ श्री-सवितृ सूर्यनारायणाय नमः’ असे म्हणून घातला, म्हणजे दुसऱ्या पद्घतीचे आवर्तन पूर्ण होते.
ह्याशिवाय तृचाकल्प आणि हंसकल्प अशा समंत्रक नमस्कारांच्या दोन पद्घती आहेत. तृचाकल्पात ऋग्वेदातील तीन ऋचा म्हणतात आणि हंसकल्पात यजुर्वेदातील ऋचा म्हणतात. या मंत्रांबरोबरच ॐ हा प्रणव आणि सहा बीजाक्षरांचा उच्चार करतात. या दोन्ही पद्घतींत पंचवीस नमस्कारांची आवृत्ती असते.
सूर्यनमस्कार पूर्ण झाल्यानंतर नमस्कारांचे सुपरिणाम वर्णन करणारा व तीर्थग्रहणाचा मंत्र ‘अकालमृत्युहरणं, सर्व-व्याधि विनाशनाय । सूर्य पादोदकं तीर्थंजठरे धारयाभ्यहम् । म्हणून तीर्थ घेतात.
नमस्कार घातला, की त्यात दहा आसनेही व्हावी अशा पद्घतीने त्यांची रचना (स्थिती) केलेली आढळते. (१) दोन्ही पावले व पाय जुळवून, गुडघे व पाठ न वाकविता ताठ उभे राहून नमस्कार करावा. त्यावेळी दृष्टी समोर किंवा नासिकाग्राकडे ठेवावी (स्थिती १० प्रमाणे) आणि श्वास घेऊन पहिला मंत्र उच्चारला म्हणजे ‘अवस्थान’ हे पहिले आसन होते (स्थिती १ पूरक). (२) गुडघे न वाकविता पावलांच्या बाजूला हातांचे तळवे टेकून नाक किंवा कपाळ गुडघ्यांना लावून श्वास सोडावा. त्यावेळी पोट आत ओढून घ्यावे. या स्थितीला ‘जानुनासन’ असे म्हणतात (स्थिती २ व ९ रेचक). (३) यानंतर कोणताही पाय मागे नेऊन बोटे जमिनीला टेकवावी. त्या पायाचा गुडघा टेकावा. दुसरा गुडघा काखेखालून दंडाच्या पुढे आणून दृष्टी शक्य तितकी वर नेऊन श्वास घेतला, म्हणजे ‘ऊर्ध्वेक्षण’ आसन होते (स्थिती ३ पूरक). (४) दुसरा पाय पहिल्यासारखाच मागे टेकून हाताची कोपर ताठ ठेवून शरीर जमिनीला समांतर ठेवावे. श्वास रोखून धरावा. ‘तुलितवपू’ हे चौथे आसन येथे होते (स्थिती ४ कुंभक). (५) यानंतर कोपरात हात वाकवून पोट जमिनीस टेकू न देता कपाळ, छाती, गुडघे जमिनीला टेकवावे आणि श्वास सोडला म्हणजे साष्टांग नमस्कार होतो (स्थिती ५ रेचक). (६) पाय, गुडघे, हात स्थिर ठेवून हात ताठ करुन छाती पुढे घेताना पाठ वाकवावी. दृष्टी शक्य तितकी वर करुन श्वास घ्यावा, म्हणजे ‘कशेस संकोच’ आसन होते (स्थिती ६ पूरक). (७) नंतर ‘कशेस विकसन’ आसनासाठी हात स्थिर ठेवत डोके खांद्यात खाली आणून हनुवटी छातीला टेकवून, कंबर उंच करताना टाचा जमिनीस टेकवाव्या आणि श्वास सोडावा (स्थिती ७ कुंभक). (८) यानंतर पुन्हा तिसरे ऊर्ध्वेक्षण आसन केल्यानंतर (स्थिती ८ कुंभक). (९) जानुनासन करुन (१०) उभे राहिले, की पहिले अवस्थान होते आणि एक नमस्कार पूर्ण होतो (स्थिती १०). पूरक म्हणजे श्वास आत घेणे, रेचक म्हणजे श्वास बाहेर सोडणे आणि कुंभक म्हणजे श्वास थांबविणे.
सूर्यनमस्कार घाई न करता सावकाश घातले म्हणजे दम लागत नाही. नमस्कार पूर्ण झाल्यावर आनंद व उत्साह वाटला पाहिजे. थकल्यासारखे वाटल्यास नमस्कारांची संख्या शरीराला झेपण्यापेक्षा जास्त झाली, असे समजून संख्या कमी करावी. बारा नमस्कार घालावयास प्रारंभ करुन झेपेल तशी संख्या वाढवावी. अगदी लहान मुलांनी बारा नमस्कार घालावे. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत पन्नास, सोळाव्या वर्षापर्यंत शंभर ते सव्वाशे आणि त्यानंतर तीस वर्षांपर्यंत सु. तीनशे नमस्कार, झेपतील त्याप्रमाणे घालण्यास हरकत नसते.
योगासने करणारांनी प्रथम नमस्कार घातल्यास उपयोग होतो. शालेय कार्यक्रमात सांघिक सूर्यनमस्कार अनेक ठिकाणी घालतात, तसेच सूर्यनमस्कारांच्या स्पर्धाही घेतल्या जातात. सूर्यनमस्कारांचा प्रसार परदेशांतही अनेक ठिकाणी झालेला दिसून येतो. शरीरसौष्ठव वाढविणारा हा व्यायाम शारीरिक कौशल्याची कामे करणाऱ्यांना पूरक ठरतो.

महाराष्ट्रातील औंध संस्थानाचे भूतपूर्व अधिपती ⇨ भवानराव पंतप्रतिनिधी यांनी सूर्यनमस्काराच्या प्रसाराचे कार्य हिरिरीने पार पाडले. त्यासाठी त्यांनी मराठी व इंग्रजी भाषांत पुस्तके लिहिली, त्यांची अनेक भाषांत भाषांतरेही झाली आहेत. प्रात्यक्षिकांसाठी त्यांनी चित्रपट व सरक-चित्रे (स्लाइड) निर्माण केली व परदेशांत सूर्यनमस्कारांचा बराच प्रचार केला. पंडित ⇨ श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनीही या विषयावर स्वानुभवातून लिखाण केलेले आहे.


1 comment:

Featured Post

HSC english Board practice paper for study

https://online.fliphtml5.com/ykpcc/hmpl/