Wednesday, September 9, 2015

आजवर जगात जेवढ्या क्रांत्या झाल्यात त्यावरून हे स्पष्ट झालेलं आहे कि,प्रत्येक क्रांतीला बंडखोरीच प्रवृत्त करत असते.खरे पाहायला गेले तर बंडखोरी प्रवृत्ती हीच क्रांतीची जननी असते.कधी तरी परिवर्तनीय ठरलेली क्रांती विराम पावते,मोडकळीस लागते,परंतु बंडखोरी हि शाश्वत सत्यासारखी चिरकाल टिकणारी असते.याच बंडखोरीच्या चोकटीत अगदी तंतोतंत बसणार नाव म्हणजे बाबा आमटे याचं! विश्वामित्रासारखी जिद्द,आव्हाने पेलण्याची शक्ती आणि उर्मी,नवनिर्माणाची कुवत अंगी असणारा हा माणूस खऱ्या अर्थाने महामानव आहे.ज्या कुष्ठरोगी वर्गासाठी त्यांचे सगेसोयरे उभे राहत नव्हते,त्यांच्यासाठी आयुष्य  वेचणारा हा माणूस जेव्हा तथाकथित माणुसकीच्या आणि भावभावनेच्या विरोधात बंड पुकारतो,तेव्हा त्याचं वेगळेपण काय आहे हे आपसूकच जाणवत.म.गांधी प्रणीत विधायक कार्य हे परंपरागत व्यवस्थेवर मात करणारे,जुने नाकारणारे   आणि नवे उभारणारे असायला हवे हा त्यांचा ठाम विश्वास.नवनिर्माणाच्या संधी पदोपदी शोधणारा हा समाजसेवी अखंड मानवजातीला माणुसकीच कोंदण देण्याचा आजन्म प्रयत्न करतो आणे ते सिद्धीसाही नेतो हीच त्यांची प्रचंड ऊर्जा.
  संतश्रेष्ठ तुकोबाराया जसे आपल्या अभंगात लाडक्या विठूरायाला सुनावतात कि,हे विठ्ठला,आम्ही भक्त आहोत म्हणून तुला किंमत आहे,तेव्हा भक्तांची परीक्षा घेऊ नकोस.अशीच काहीशी विद्रोही प्रवृत्ती बाबांच्या ठायीसुद्धा जाणवते,बेफिकिरी,आत्मविश्वास,निरपेक्षता हि त्यांची मुल्ये त्यांच्या कवितेतून त्यांनी अधोरेखित केलेली आहेत.श्रमाचं मुल्य काय आहे हे,श्रम न करणाऱ्या,अखंड निद्रिस्त आळशी देवाला सांगताना बाबा  म्हणतात,
                              भगवान विष्णू पहुडले आहेत म्हणतात शेषावर
                                      गर्दीचे हे जनता जनार्दन मात्र 
                                       कायमचे झोपले आहेत.
                          आपल्या आशा-आकांक्षांच्या भग्न अवशेषांवर
                                  नाही करू शकत,कोणी आपले भले
                                               या निश्चिंतीने.
अशाच  अखंड निद्रिस्त समाजाला कृतीतून नवनिर्माणाचा मार्ग "तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार" या भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानातून सांगण्याचा प्रयत्न प्रत्यक्ष कृतीतून बाबांनी आयुष्यभर केला.ते तरुणांना नेहमी सांगत कि, भान ठेऊन योजना करा आणि बेभान होऊन काम करा.त्यांच्या या मूलमंत्राचा वसा घेतलेले शेकडो तरुण-तरुणी आज त्यांचा वारसा पुढे नेत आनंदवन   ,हेमलकसाच्या आश्रमात कुष्ठरोग्यांची सेवा करताना पाहायला मिळतात.  
   बाबांच्या आयुष्यावर विनोबा-गांधी यांच्या विचारांचा पगडा होता.विनोबा-गांधीजींच्या पश्चात त्यांची भूमिका मांडण्याचा त्यांनी सदोदित प्रयत्न केला.नव्यासाठी जुने साचे चालत नाही,ते कालबाह्य झाले कि नवे साचे निर्माण   करावे लागतात हीच त्यांची शिकवण.त्यांनी उभ्या केलेल्या कुष्ठनिवारण आश्रमाचे कार्य तर वादातीत आहे.अशी दयाबुद्धी,धर्मादाय भावनेतून अनेक कार्ये आपल्या आजूबाजूला घडत असतील,परंतु या कुठल्याच प्रकारात बाबांचं कार्य मोडत नाही.त्यांच्या कार्यासाठी निरपेक्षतावादाचा सिद्धांतही कमी पडतो.त्यांच्या एकंदर कार्यप्रक्रीयेतून त्यांना गांधी-विनोबा आणि मार्क्स कसे  समजले याचा अंदाज येतो.गांधी आणि मार्क्स हे क्रांतिकारी द्रष्टे पुरुष.गांधी हे माणसातील सदभावांची चिकित्सा करतात तर मार्क्सला मुक्त मानव हवा आहे.य दोन्ही विचारप्रणालीतून   बाबांनी मुक्त,समृध्द,अभिक्रमयुक्त संपन्न माणूस घडविण्याचा प्रयत्न केला.आजवर जगात जेवढ्या म्हणून क्रांत्या झाल्या,परिवर्तने झाली,त्या नव्या व्यवस्थेचे नाव घेऊन,नवे सरकारे स्थापुनच थांबल्या.स्थापन झालेल्या प्रत्येकच क्रांतीने जनतेऐवजी शासनाचे सामर्थ्य वाढविलेले आहे. म.गांधीनाही याची जाणीव होती आणि समर्थ भारत उभारणीसाठी अजून योजना बनविण्याच्या प्रक्रियेत असतानाच दुर्दैवाने त्यांची हत्या झाली.गांधींच्या मृत्युनंतर त्यांचे राजकीय क्षेत्रातील अनुयायी थकले,परंतु कल्पनेतील स्वयंशासि विमुक्त समाजासाठी थोडेबहुत काम करणारे जयप्रकाश नारायण आणि बाबा आमटे यांनी  कुणाचीही वाट न पाहता शाश्वत क्रांतीचा मार्ग धरला.क्रांती अधेमधे सोडून चालत नाही,काम संपले नि आपण सुटलो असे बाबांनी कधीच होऊ दिले नाही,आणि तसे मानलेही नाही.     
त्यांनी पत्करलेल्या क्रांतीतील   एक कार्य शेकडो कार्याला जन्म देणारे ठरले.त्यांच्यासमोर जसजसा कामाचा डोंगर उभा राहत गेला,तसा तसा कार्यकर्त्यांचा संचही त्यांच्यापाठी  उभा राहिला,यावरूनच त्यांच्या कार्याची विधायकता स्पष्ट व्हावी.अविरतपणे,कार्यमग्न राहून आणि प्रश्नांच्या माथ्यावर पाय देऊन आज बाबा आमटे नामक व्यक्ती इतक्या उंचावर पोहोचली आहे कि,तिथपर्यंत आपली दृष्टी पोहोचणे सुद्धा अशक्य आहे.
  स्वातंत्र्यप्राप्तीनंतर रूढ अर्थाने असा समाज निर्माण झाला कि,विधायक कामे हि सरकारचे शेपूट बनूनच करता येते,विधायक कामांची हि व्याख्या मानणारे सरकारी गोटातच  भरपूर निघाले,.आपल्या "विधायक" कार्यासाठी त्या त्या व्यक्तींनी सरकारकडून भरभरून अनुदान लाटले आणि आपली विधायकतेची देव्हारे  मिरवून घेतली.या सगळ्या प्रकारातून बाबा नेहमीच अलिप्त राहिले,आपल्या कामात संघर्ष आणि विरोधाची अपेक्षा त्यांनी आरंभीपासूनच बाळगलेली होती,म्हणून तर वकीलीसारखा पांढरपेशा व्यवसाय सोडून ,कुष्ठनिवारणाचा खडतर मार्ग त्यांनी स्वीकारला.चिकित्सेतून,विश्लेषणातून आणि समीक्षणातून त्यांनी हा मार्ग निवडलेला होता.दैवापेक्षा कर्मावर विश्वास ठेवणारे बाबा नेहमी म्हणत असत,परमेश्वरानेही स्वतःला सिध्द केल्याशिवाय मी त्याचाही स्वीकार करणार नाही.संघर्षातून मिळालेली लहानातून लहान गोष्टसुद्धा शाश्वत आनंद देणारी असते,तर आयती मिळालेली गोष्ट कितीही मोठी असली तरी ती नाशवंत असते हीच त्यांची यामागचे वस्तुनिष्ठता होती.त्यामुळेच आश्रमातील बोटे झडलेल्या हातांना स्वयंरोजगारातून प्रतिष्ठा मिळून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.  
  सहा कुष्ठरोगी,१४ रुपये रोख,१ आजारी गाय,सरकारकडून मिळालेली ५० एकर नापीक जमीन या बळावर वारोरासारख्या गावात त्यांनी आपल्या पत्नीच्या,साधनाताईच्या सहकार्याने फुलविलेले आनंदवन इतक्या सहजासहजी साकारले  गेले नाही.विधायक कामांत येणाऱ्या विरोधाला ते तरी कसे अपवाद ठरणार  होते? परंतु जो जो विरोध,आपत्ती आली त्या त्या विरोधांना,आपत्तींना लोकशक्ती उभी करून नाहीसे करण्याची ताकद त्यांच्याठायी होती.एकदा स्वीकारलेल्या कार्यात कधीही त्यांनी तडजोड केली नाही.संघर्षासाठी संघर्ष न करता विधायक कामाचाच तो अनिवार्य भाग होता आणि त्याचा कर्तव्य म्हणून बाबांनी आजन्म  स्वीकार केला.
  मार्क्सपासून गांधींपर्यंतच्या सर्वच क्रांतीकारकांना संघर्षा इतकेच प्रेमाचे शस्रही फार महत्वाचे आणि मोलाचे वाटत आले आहे.गांधीच्या प्रेमाचं आणि मार्क्सच्या संघर्षाची आपण विनाकारण आजपर्यंत कुत्सा करत आलो आहोत.या दोन्ही  गोष्टी आवश्यक आणि क्रांतीची अविभाज्य घटक आहेत,हे बाबांनी आपल्या कार्यातून दाखून दिले आहे.रेल्वेत इंग्रज अधिकारी  एका भारतीय महिलेची छेडछाड करताना पाहून त्यांनी जीवाची बाजी  लाऊन त्याला प्रतिकार करणारा हा महामानव "अभय साधक" या गांधीजींनी दिलेल्या उपाधीस त्यामुळेच पात्र ठरतो.न्यायासाठी लढणारा असा हा अभय साधक ,शाश्वत क्रांतीचा स्थायी भाव हा बंडखोरीच आहे हे पदोपदी दाखऊन देत.बाबा गेल्यानंतरही त्यांची मुले,सुना,नातवंडे त्यांच्या कार्याचा हा रथ पुढे नेत आहेत.बाबा आमटे हे एक साधारण मनुष्य  होते.त्यांच्या ठायी असलेली गुणसंपदा आणि कार्यकौशल्य हा निव्वळ योगायोग नव्हता,तर आयुष्यभराच्या कमाईतून जमविलेल "क्रियमाण संचित" होत.आमटे कुटुंबीयासारखी माणसे आज आपल्यात आहेत म्हणून प्रकाशाची हमी आहे आणि अंधाराची धास्ती नाही.बाबा आपल्या एका कवितेत म्हणतात,
                              जहाजाबरोबर स्वतःला बुडवून घेणारे कर्णधार जेथे असतात,
                              तेथेच बुडता देश वाचविणाऱ्या नाविकांच्या पिढ्या जन्म घेत असतात
                              वाट पाहणाऱ्या किनाऱ्यांना व लाटांच्या उग्र कल्लोळाला कळू द्या
                              मी अजून जहाज सोडलेले नाही!
बाबांसारखा मनस्वी माणूस गांधी-विनोबांच्या नंतर आपले जहाज सांभाळून मी अजून जहाज सोडले नाही असा निर्धार व्यक्त करत शेवटच्या श्वासापर्यंत जगला.मानवी समुदायाच्या समुद्रात,समाजव्रत  घेतलेला हा नावाडी आज आपल्यात नसला तरी,त्यांच्या प्रेरणेने असंख्य नवे कार्यकर्ते या आमटे कुटुंबियांसमवेत या जहाजाचे नावाडी होण्याची भूमिका सकारत आहेत आणि बाबांच्या कार्याचा कळस गाठण्यासाठी धडपडत आहे.बाबांच्या या कार्यकर्तुत्वाला  त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त कोटी कोटी अभिवादन!

No comments:

Post a Comment

Featured Post

english grammar and practice filphtml book

https://online.fliphtml5.com/ykpcc/xphi/