Saturday, August 8, 2015

‘सरल’मुळे शिक्षक वैतागले Maharashtra Times | Aug 9, 2015, 12.45 AM IST विद्यार्थ्यांची माहिती भरण्याचे काम रखडले म. टा. वृत्तसेवा, नगर शालेय विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती संकलित करून ती सरल प्रणालीद्वारे ऑनलाइन भरण्याचे काम शिक्षकांना देण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वेबसाईटवर काम करण्यास अनेक अडचणी येत असल्याने शिक्षक वैतागले आहेत. दोन दिवसांपासून अहोरात्र क्लिक करूनही सरल प्रणालीची वेबसाइट बंदच आहे. खेड्यांमधील स्थिती तर यापेक्षा वाईट. लाईट, इंटरनेटच्या रेंजचा अडथळा पार करत शहरासह मोठ्या गावात मुक्काम केला. तेथेही हीच परिस्थिती असल्याने विद्यार्थ्यांची माहिती भरण्याचे काम अपूर्णच राहिले आहे. माहिती का भरली नाही म्हणून अध्यापनापेक्षा लेखनिकांच्या कामाने जर्जर झालेला शिक्षक पुन्हा वेबसाइट सुरू करण्याचा प्रयत्न करत असल्याची परिस्थिती गावोगावी दिसत आहे. सरल या राज्य सरकारच्या संगणक प्रणालीद्वारे शाळा, शिक्षक, विद्यार्थ्यांची माहिती वेबसाइटवर भरण्याचे काम सुरू आहे. शाळेचे मुख्याध्यापक वर्ग व तुकड्या तयार करून शिक्षकांची संख्या नोंदवून त्यांचे पासवर्ड तयार करतात. तुकड्यांना वर्ग शिक्षक नेमून ते विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाइन पद्धतीने भरतात. सरलची माहिती कम्प्युटर किंवा अँड्राईड मोबाइलवरही ऑनलाइन भरता येऊ शकते. सरलच्या माहितीसाठी अनेक शाळांमधून महिन्यापासून काम सुरू आहे. यासाठी आधारकार्ड क्रमांक, कौटुंबिक माहिती, विद्यार्थ्यांचा रक्तगट, बँक खाते, उत्पन्नाचा दाखला, जन्मखूण यासह इतर कौटुंबिक माहिती संकलनाचा फॉर्म भरण्याचे काम शालेय स्तरावर करण्यात आले. फॉर्म भरण्यासाठी लागणारी माहिती संकलित करण्यासाठी पालकांचीही धावपळ झाली. फॉर्म भरल्यानंतर सरकारच्या नव्या आदेशानुसार या महिन्यात नवे सोपे फॉर्म देण्यात आले. शिक्षकांची नव्याने माहिती भरण्यासाठी पुन्हा धांदल सुरू झाली. शिक्षकांना सरल प्रणालीवर प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती भरावी लागणार आहे. माध्यमिक शाळांना लेखनिकांची पदे आहेत. जिल्हा परिषद तसेच खासगी प्राथमिक शाळांना लेखनिक नसल्याने ही माहिती शिक्षकांनाच भरावी लागत आहे. माहिती भरण्यासाठी एकाचवेळी अनेकांचा वेबसाइट उघडण्याचा प्रयत्न सुरू आहे. दिवसा वेबसाइट हँग होत असल्याचा समज झाल्याने काही शिक्षक रात्री, अपरात्री किंवा पहाटे कम्प्युटर सुरू करतात. तरीही वेबसाइट बंदच. या प्रकारामुळे शिक्षक हैराण झाले आहेत. उदिद्ष्टपूर्तीसाठी मंत्रालयीन पातळीवरील अधिकारी जिल्हास्तरावरच्या अधिकाऱ्यांना आदेश देतात. जिल्हा पातळीवरील अधिकारी तालुका पातळीवरील अधिकारी व आता थेट शिक्षकांनाच दट्ट्या लावत आहेत. माहिती संकलनासाठी होणारा कालापव्यय, तांत्रिक कारणांमुळे सरल माहिती संकलनासाठी लागणारा वेळ पाहता, शिक्षकांपुढे अभ्यासक्रम उरकण्याचीही परीक्षा आहेच.

No comments:

Post a Comment

Featured Post

english grammar and practice filphtml book

https://online.fliphtml5.com/ykpcc/xphi/