Saturday, August 15, 2015

आज 16 ऑगस्ट... कालच सर्वांनी स्वातंत्र्यदिन साजरा केलेला. आणि आज पुन्हा रोजच्या सारखीच शाळा भरलेली... प्रार्थना होताच हेडमास्तरांचा पहिलाच प्रश्न: "काल कोण कोण नव्हते आले रे?" एकूण 169 च्या संख्येतून 7-8 चेहरे उभे राहिले. मग एकेक फेकाफेकी सुरु झाली!! डोके दुखत होते...पोटात दुखत होते... वगैरे कारणे सुरु झाली!! या सगळ्यांमध्ये 7 वी ला असलेल्या गणू चा ही नंबर होता... "का रे गण्या का नाही आलास" मास्तरांनी विचारले. "सर.. शेतावर गेलतो.. आय म्हणलि चार दिस शेताला पाणी नाई... म्हणून आमच्या शेजारच्या काकांचि मोटर आणून पाणी चालु करायचे व्हते..." -गणु. गण्या चे उत्तर ऐकून पूर्ण वर्ग हसु लागला!! "मूर्खा! आजारी नव्हतास तरी नाही आलास? मास्तर थोड़े तापले होते... "स्वातंत्र्यदिन म्हणजे काय ते कळते का? कळते का???" मास्तरांचा आवाज आणखी चढ़ला... गणु शांतच उभा राहिला. त्यात पूर्ण वर्ग तोंड लपवत हसत होता हे पाहुन तो आणखिच ओशाळला... मास्तर पुन्हा सुरु झाले..." गधड्या, आपल्या स्वातंत्र्य वीरांनी स्वतः चे जीव देऊन देशाला 15 ऑगस्ट 1947 साली आपल्याला इंग्रजांपासून स्वतंत्र केले म्हणून आज आपण सुखी आहोत" असे म्हणत त्याच्या कानशिलात चापट लगावली... "जाऊ दया ओ सर... ह्या मंद मुलांना फक्त खायचे प्यायचे अन झोपायचे एवढेच कळते!!" मास्तरांच्या शेजारी बसलेल्या जोशी मॅडम नी आगीत तेल ओतले... विषय संपला. ...पण गण्याचे तोंड मात्र दिवस भर पडलेलेच होते. साडेपाच वाजले. शाळा सुटली. गणू मात्र अजूनही स्वातंत्र्याच्याच विचारात होता.... " नक्की काय आस्तेय हे स्वातंत्र्य बितंत्र्य? मागच्या वर्षी सावकाराचे कर्ज फिटत नाही म्हणून बापानी जीव दिला... तेव्हा भारत स्वतंत्र नव्हता काय? आय रोज शेतात राबते आणि आपल्याला खायला घालते... तीला स्वातंत्र्य द्यायला इंग्रज विसरले असतील काय? ताई कॉलेजवरुन येताना ती कट्टया वरची टारगट मुले तिची छेड़ काढतात... याला स्वातंत्र्य म्हणत असतात काय? मागच्या महिन्यात वरच्या आळीतुन फिरताना मला एका माणसाने "ए म्हाराच्या" म्हणून हाक मारली होती... म्हणजे तो माणूस पण इंग्रज असेल काय?? " एव्हाना गण्याचे 12 वर्षाचे डोके काहीच्या काही विचार करीत-करीत जड झाले होते.... घरी पोहोचला... लगेचच दप्तर टाकून दिले... आणि गुरांना चरायला नेण्यासाठी बाहेर पडला.... ....घराच्या ओठ्यावर कोपऱ्यात गेली 2 वर्षे पाळुन ठेवलेला पोपट होता... तिकडे सहज नजर गेली... "ह्या मिठुला आपण जंगलातुन पकडून आणले.... पिंजऱ्यात् ठेवले... मस्त खाऊ पिऊ सुद्धा घातले... एवढेच काय तर 2 वर्षात हा आता माणसासारखा काही काही बोलू सुद्धा लागलाय....पण याचा अर्थ तो आनंदात असेल असे नाय ना!!" "... ह्याला आपण पिंजऱ्यात टाकले.... म्हणजे आपण इंग्रज झालोय!! आणि हा? हा तर स्वातंत्र्यवीर!!" गण्या त्याच्यापाशी गेला... सहजच न्याहाळले... पण आज त्याची नजर नेहमीपेक्षा खुपच वेगळी होती. जणू त्याला स्वातंत्र्याचा उलगडा झाला होता... इतक्यात पोपट बोलला "जय हिंद!! भारत माता की जय!!" बहुधा कालच्या स्वातंत्र्य रॅली मधून त्या बोलक्या पोपटाने सुद्धा काही शब्द उचलले होते!! गणु आणखी पुढे झाला... "मी इंग्रज, तू स्वातंत्र्यवीर... मी इंग्रज... आणि तू स्वातंत्र्यवीर$$$" असे काहीसे पुटपुटत पिंजऱ्याचे दार उघडले!!! पोपटाने उंच अवकाशात झेप घेतली!! खरे स्वातंत्र्य तर आज मिळाले होते... त्या पोपटाला... आणि गणुच्या विचारांनाही

No comments:

Post a Comment

Featured Post

HSC english Board practice paper for study

https://online.fliphtml5.com/ykpcc/hmpl/